पाकचे लवकरच ४ तुकडे होऊन ३ तुकड्यांचा भारतात विलय होईल ! – योगगुरु रामदेवबाबा

योगगुरु रामदेवबाबा

हरिद्वार (उत्तराखंड) – पाकिस्तानचे लवकरच ४ तुकडे होतील. बलुचिस्तान वेगळा देश बनेल. तसेच सिंध, पंजाब आणि पाकव्यप्त काश्मीर यांचा भारतात विलय होईल. येणार्‍या काळात भारताचा एका महाशक्तीच्या रूपात उदय होईल, असे विधान योगगुरु रामदेवबाबा यांनी येथे केले. ते पतंजलि योगपीठामध्ये प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करतांना बोलत होते.

सनातनवरील आक्रमण सहन करणार नाही !

योगगुरु रामदेवबाबा पुढे म्हणाले की, आजकाल सनातन धर्मावर सातत्याने आक्रमणे होत आहेत. रामायण, श्रीमद्भगवद्गीता, वेद आणि उपनिषदे यांना कलंकित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सर्व आंतरराष्ट्रीय षड्यंत्राद्वारे केले जात आहे. सनातनच्या विरोधात चालू असलेला अपप्रचार आम्ही अजिबात सहन करणार नाही.

सनातन धर्मला हीन दाखवण्यासाठी देशात धार्मिक आतंकवाद चालू आहे. कधी सनातन धर्मावर, कधी आमच्या महापुरुषांच्या चरित्र्यावर विविध प्रकारचे लांछन लावले जात आहे. जे करत हे करत आहेत, ते राष्ट्रविरोधी आहेत. हे सर्व विदेशी शक्तींच्या आदेशावरून केले जात आहे.