हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक सामर्थ्य आणि हिंदूसंघटन यांची आवश्यकता ! – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

बोरी, फोंडा येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा

श्री. गोविंद चोडणकर

बोरी (फोंडा), २१ जानेवारी – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक सामर्थ्य आणि हिंदूसंघटनाची शक्ती या दोन्हींची आवश्यकता आहे. हिंदूसंघटन करतांना हिंदूंच्या रक्षणासाठी ‘शक्तीची उपासना’ करण्याच्या जोडीला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून ‘उपासनेची शक्ती’ वाढवण्याची आज आवश्यकता आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर यांनी येथे केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देऊळवाडा, बोरी येथील श्री नवदुर्गा देवस्थान सभामंडपात आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत श्री. गोविंद चोडणकर बोलत होते. या वेळी ‘रणरागिणी’च्या सौ. सुमेधा नाईक वक्त्या या नात्याने उपस्थित होत्या. या सभेला सनातन संस्थेच्या ६२ व्या संत पू. सुमन नाईक यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

श्री. गोविंद चोडणकर पुढे म्हणाले, ‘‘मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशिला आहे, तसेच मोठ्या प्रमाणात सकारात्मकता आणि चैतन्य प्रदान करणारी केंद्रे आहेत. ही मंदिरे आज हिंदूंसाठी धर्मशिक्षणाची केंद्रे व्हायला हवीत. ‘हलाल जिहाद’ची भीषणता लक्षात घेऊन हिंदूंनी हलाल प्रमाणित वस्तूंवर बहिष्कार घालायला हवा.’’सभेच्या अखेर उपस्थितांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सामूदायिक प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सुरभी छत्रे यांनी, तर आभारप्रदर्शन श्री. प्रकाश नाईक यांनी केले.

हिंदु युवतींच्या सुरक्षिततेसाठी  हिंदु राष्ट्र आवश्यक ! – सौ. सुमेधा नाईक

सौ. सुमेधा नाईक

‘रणरागिणी’च्या सौ. सुमेधा नाईक म्हणाल्या, ‘‘लव्ह जिहाद हे हिंदूंचा वंशविच्छेद करणारे एक संकट आहे. ‘धर्मशिक्षणाचा अभाव’ आणि ‘हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व न समजणे’, यांमुळे हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडून धर्मांतरित होत आहेत. हे रोखण्यासाठी मुलीला लहानपणापासूनच धर्मशिक्षण देणे, घरातील सर्व सदस्यांनी धर्माचरण आणि साधना करणे, तसेच हिंदु युवतींना पूर्णत: सुरक्षित करण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अत्यावश्यक आहे.’’