|
सांखळी (गोवा) – ‘म्हादई वाचवा, गोवा वाचवा’ आघाडीच्या विर्डी, सांखळी येथील सभेला अनुमाने १० सहस्र लोकांनी उपस्थिती लावून गोमंतकीय म्हादईच्या प्रश्नावरून संघटित असून कोणत्याही परिस्थितीत म्हादईचे पाणी कर्नाटकला वळवू देणार नाही, असाच संदेश दिला आहे. या सभेत सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी, इतिहासतज्ञ, विविध संघटनांचे नेते, कार्यकर्ते, विरोधी राजकीय पक्षांचे एकूण ७ नेते आदी उपस्थित होते.
सभा चालू होण्यापूर्वी म्हादईवर आधारित शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नृत्य, छोटी नाटिका सादर केली. सभेच्या व्यासपिठावर एक मोठा कलश (हंडा) ठेवण्यात आला होता. या कलशात राज्याच्या ११ तालुक्यांतील जलसाठ्यातून आणलेले पाणी एकत्रित करण्यात आले. त्यानंतर वक्त्यांची भाषणे झाली. प्रेक्षकांमध्ये सर्वांत पुढे राज्यातील सर्व ४० आमदारांसाठी आसनव्यवस्था करण्यात आली होती. भाजपचे ३३ आमदार वगळता इतर सर्व पक्षांचे आमदार सभास्थळी उपस्थित होते.
सभेतील ठराव
सर्वांनी उभे राहून ‘आमची म्हादय आमका जाय’ या घोषणेत पुढील २ ठराव संमत केले.
१. केंद्रीय जलआयोगाने कर्नाटकच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला दिलेली संमती मागे घ्या.
२. गोवा सरकारने संवेदनशीलतेने आणि दायित्वाने वागावे अन् या जनआंदोलनाला पाठिंबा द्यावा. सरकारने म्हादईच्या रक्षणासाठी कोणताही निष्काळजीपणा करू नये. कुणाच्याही कसल्याही प्रकारच्या दबावाला बळी पडून म्हादई नदीचा बळी देऊ नये.
म्हादईसाठी मान्यवरांचे गोमंतकियांना आवाहन !
नद्या वाचल्या, तरच आपण जिवंत राहू ! – राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी
आपण गोमंतकीय भाषा, संस्कृती या विषयांसंदर्भात अभिमानी असलो, तरी नैसर्गिक संपत्तीच्या संदर्भात आपण निरक्षर आहोत, हे दुःखदायक आहे. जेव्हा लोकांना गोव्यात किती नद्या आहेत ? असे विचारले जाते, तेव्हा ते २-३ नद्यांचीच नावे सांगू शकतात. अशी परिस्थिती आहे.
गोवा हे नाव मांडवी नदीवरून, जी वरच्या भागात म्हादई म्हणून ओळखली जाते, त्यावरून देण्यात आले आहे. सध्या दुःखदायक गोष्ट ही आहे की, म्हादईच्या पाण्याचे विभाजन झाले आहे. गोव्यातील पाणी कर्नाटकला देणार नाही, असे राज्यकर्ते कसे काय म्हणतात ? कर्नाटकने यापूर्वीच पाणी वळवले आहे. कर्नाटकला त्यांच्या नियोजनाप्रमाणे म्हादईचे पाणी कर्नाटकात १५० कि.मी. अंतरावर न्यायचे आहे. गोव्यात केवळ जुने गोवे येथील चर्च ‘जागतिक वारसास्थळ’ म्हणून घोषित झाले आहे; पण म्हादई अभयारण्य आणि गोव्यातील पश्चिम घाट ही ‘जागतिक वारसास्थळे’ नाहीत. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील पश्चिम घाटाचा भाग युनेस्कोने ‘जागतिक वारसास्थळ’ म्हणून घोषित केला आहे. तसे गोव्यातही व्हायला हवे. तसे झाले, तर कर्नाटकला अभयारण्यातून पाणी वळवता येणार नाही. या सूत्रावर सरकारने न्यायालयात लढावे. आपल्या नद्या वाचल्या, तरच आपण जिवंत राहू. त्यामुळे मी विनंती करतो की, हा प्रश्न केवळ सरकारचा नाही, तर आपल्या अस्तित्वाचा आहे. ही एकी केवळ आजच्या दिवसापुरती नको, तर सर्वच नद्या वाचवण्यासाठी एकी दाखवा.
म्हादईसाठी रस्त्यावर उतरावे लागेल ! – ॲड्. हृदयनाथ शिरोडकर, सामाजिक कार्यकर्ते
‘आमची म्हादय आमका जाय’, केवळ अशा घोषणने म्हादई वाचणार आहे का ? त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल. कर्नाटकात जाऊन वळवलेले म्हादईचे पाणी परत आणायची तुमची सिद्धता आहे का ?
मुख्यमंत्री म्हणतात, यासाठी प्राधिकरण स्थापन करा. पाणी आमचे आहे, तर ते आम्हाला मिळालेच पाहिजे. त्यासाठी प्राधिकरण कशासाठी ? एका धारवाड जिल्ह्यासाठी कर्नाटक आमची नदी मागत आहे. आजची सभा तुम्हा सर्वांचा आवाज केंद्रापर्यंत पोचवण्यासाठी आहे. आपली पुढची सभा कणकुंबी येथे घेऊया.
म्हादईच्या सूत्रावर आपण एक झाले पाहिजे ! – प्रा. सुभाष वेलिंगकर, भारत माता की जय संघ
आज जमलेला जनता जनार्दन ‘म्हादई वाचवा, गोवा वाचवा’, या उद्देशाने जमला आहे. सर्वांनी एकजूट दाखवली, त्यासाठी सर्वांचे अभिनंदन करतो.
३ वर्षे भारत माता की जय संघाने म्हादई संदर्भात जनजागृती केली. वर्ष २०१७ मध्ये रथयात्रा काढली, त्या पुढील वर्षी २७० गावांत म्हादईच्या संदर्भात जनजागृती केली आणि तिसर्या वर्षी ११२ गावांत जनजागृती केली. म्हादई हा आमच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे. आपले विचार भिन्न असतील, पण म्हादईच्या सूत्रावर आपण एक झाले पाहिजे.
♦ ‘म्हादई जलवाटप तंटा’ या संदर्भातील आजपर्यंतच्या घडामोडी पाहण्यासाठी क्लिक करा ♦