संपूर्ण जोशीमठ गावाचेच स्थलांतर करणे अयोग्य ! – सर्वेक्षण पथक

नवी देहली – उत्तराखंडमधील जोशीमठ गाव सध्या भूस्खलनाचा सामना करत आहे; मात्र संपूर्ण जोशीमठ गावाचेच स्थलांतर करणे अयोग्य आहे, असे मत जोशीमठाला भेट दिलेल्या सर्वेक्षण पथकाने व्यक्त केले. कुठल्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोचण्यापूर्वी हे पथक जोशीमठाचे पुन्हा सर्वेक्षण करणार आहे.


या सर्वेक्षण पथकात श्रीनगर येथील एच्.एन्.बी. गढवाल मध्यवर्ती विश्‍वविद्यालयाच्या भूगोल विभागाचे प्रा. मोहन सिंह पनवार, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाचे उपमहासंचालक डॉ. सेंथिएल आणि देहली विद्यापिठाचे प्रा. तेजवीर राणा यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या पथकाने जोशीमठ गावाला भेट देऊन तेतील भूमी खचण्याचा शास्त्रीय आणि सामाजिक आधार शोधण्याचा प्रयत्न केला.

१. प्रा. पनवार यांनी सांगितले की, सर्वेक्षणाच्या दृष्टीकोनातून जोशीमठ गावाचे ५ विभाग करण्यात आले आहेत. यामध्ये उच्च प्रभाव, मध्यम प्रभाव, अल्प प्रभाव, सुरक्षित क्षेत्र आणि बाहेरील क्षेत्र यांचा समावेश आहे.


२. गेल्या ५० वर्षांत जोशीमठ हे गाव कसे पालटले ?, याचा वैज्ञानिक दृष्टीकोनातून अभ्यास केला जात आहे. या कालावधीत झालेल्या भूस्खलनाच्या घटनांचा अभ्यास केला जात आहे, तसेच बांधकामाचा अभ्यास केला जात आहे.

३. जोशीमठातील भूस्खलनाला कारणीभूत घटक शोधण्यासाठी ‘रिमोट सेन्सिंग’वरून उपलब्ध उपग्रह छायाचित्रांचाही अभ्यास केला जात आहे. त्यानंतर संपूर्ण अहवाल सिद्ध करून तो सरकारकडे सुपुर्द केला जाईल, असेही प्रा. पनवार यांनी सांगितले.