कोल्हापूर, १३ जानेवारी (वार्ता.) – विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, शिवप्रेमी संघटना, शिवभक्त यांना विश्वासात न घेता आमदार विनय कोरे यांच्या उपस्थितीत विशाळगड येथील अतिक्रमणाच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक म्हणजे एकप्रकारे अतिक्रमणकर्त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होता. ही गोष्ट शिवभक्तांच्या लक्षात येताच या सर्वांनी मिळून प्रशासनास खडसावले. अखेर हिंदुत्वनिष्ठांच्या आक्रमक पवित्र्यामुळे प्रशासानास बैठक रहित करण्याची नामुष्की ओढावली.
प्रशासनाने कोणताही एकतर्फी निर्णय घेऊ नये, अन्यथा यापुढील काळात हिंदुत्वनिष्ठ आणि शिवप्रेमी गप्प बसणार नाहीत ! – हर्षल सुर्वे
या संदर्भात ‘शिवदुर्ग आंदोलना’चे श्री. हर्षल सुर्वे म्हणाले, ‘‘या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत आम्हा सर्वांची बैठक झाली. त्या वेळी १ मासाची नोटीस देऊन अतिक्रमण हटवण्याचा निर्णय झाला होता. असे असतांना प्रशासन एकतर्फी बैठक कशी काय आयोजित करू शकते ? आमदार विनय कोरे हे १०० ते १५० मतांसाठी अतिक्रमणकर्त्यांच्या पाठीशी रहाणार आहेत का ? आमदार विनय कोरे यांनी आम्हाला विश्वासात घेऊन विशाळगड अतिक्रमणमुक्त आणि स्वच्छ केल्यास त्यांची ५ सहस्र मते वाढतील, हे त्यांनी लक्षात ठेवावे. यापुढील काळात प्रशासनाने कोणताही एकतर्फी निर्णय घेऊ नये, अन्यथा यापुढील काळात हिंदुत्वनिष्ठ आणि शिवप्रेमी गप्प बसणार नाहीत.’’
या प्रसंगी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे श्री. शिवानंद स्वामी म्हणाले, ‘‘गेल्या २ वर्षांपासून प्रशासकीय स्तरावर हे अतिक्रमण नेमके कुणाचे आहे ? याची टोलवाटोलवी चालू आहे. त्यामुळे प्रशासनाने विनाविलंब आता अतिक्रमणकर्त्यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. विशाळगड येथील शेवटचे अतिक्रमण निघेपर्यंत समितीचा लढा चालूच राहील.’’
संबंधित प्रशासकीय अधिकार्यांचा हिंदुत्वनिष्ठ आणि शिवभक्त यांना प्रश्न
तुम्ही स्वयंभू शिवभक्त आहात का ?
पत्रकारांना माहिती देतांना हिंदुत्वनिष्ठ फत्तेसिंह सावंत म्हणाले, ‘‘प्रशासनाने बोलावलेल्या आजच्या बैठकीच्या संदर्भात त्यांच्याकडून नेमकी माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही काही हिंदुत्वनिष्ठ आणि शिवभक्त संबंधित प्रशासकीय अधिकार्यांकडे गेलो होतो. त्या वेळी प्रशासकीय अधिकार्यांनी ‘तुम्ही स्वयंभू शिवभक्त आहात का ?’ असा प्रश्न उपस्थित केला. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. स्थानिक प्रतिनिधींना घेऊन मतांचा जोगवा घेण्यासाठी या बैठका होणार असतील, तर हे अत्यंत चुकीचे आहे.’’