भोगी आणि मकर संक्रांत सण ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून साजरा करावा !  – विकास पाटील, संचालक, कृषी आयुक्तालय  

शासनाच्या विविध मोहिमांच्या प्रचारासाठी हिंदूंच्या सणांचा आधार ! 

सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) – ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३’ अंतर्गत भोगी आणि मकरसंक्रांत सण महाराष्ट्र राज्यात ‘पौष्टिक तृणधान्य दिन’ म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे संचालक (विस्तार आणि प्रशिक्षण) विकास पाटील यांनी  केले आहे.

मकरसंक्रांतीचे औचित्य साधून प्रत्येक कृषी साहाय्यक त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम, आरोग्यावर आधारित चर्चासत्राचे आयोजन, तसेच तृणधान्य पिकांच्या विविध जाती, त्यांची लागवड करण्याचे तंत्रज्ञान, तृणधान्य पिकवणार्‍या शेतकर्‍यांच्या यशोगाथा, मुलाखती, तृणधान्य पिकांपासून बनवण्यात येणारे विविध उपपदार्थ यांची माहिती देण्यासाठी प्रगतीशील शेतकरी, आहारतज्ञ, विद्यापिठांचे शास्त्रज्ञ यांना निमंत्रित करून कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाने वर्ष २०२३ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. या अनुषंगाने कृषी विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. (हिंदूंचे सण, उत्सव आणि परंपरा यांवर टीका करणारे तथाकथित पुरो(अधो)गामी यांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, हिंदूंच्या सणांमधून धार्मिक गोष्टी सांगण्यासह समाजाचाही विचार केला जातो; म्हणूनच शासनाच्या बहुतांश योजनांच्या  प्रचार-प्रसारासाठी हिंदूंच्याच सणांचा उपयोग केला जातो. – संपादक)