गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या मिथेनवर चालणार ट्रॅक्टर !

ब्रिटीश आस्थापनाने केले संशोधन !

नवी देहली –  ‘न्यू हॉलंड’ या ब्रिटीश आस्थापनाने द्रवरूप मिथेनवर चालणारा नवीन ट्रॅक्टर विकसित केला आहे. या ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतकर्‍यांचे महागड्या डिझेलवर खर्च होणारे पैसे वाचणार आहेत, तसेच शेतीची कामे करतांना ट्रॅक्टरमधून होणारे  कार्बन उत्सर्जनही थांबवता येणार आहे. विशेष म्हणजे, गायीच्या शेणापासून ट्रॅक्टरसाठी आवश्यक असलेला मिथेन सहजपणे सिद्ध करता येऊ शकतो. ‘गूड न्यूज नेटवर्क’ने  याविषयी वृत्त प्रसिद्ध केले आहे.

हे ब्रिटीश आस्थापन १० वर्षांहून अधिक काळ बायोमिथेन उत्पादनांवर संशोधन  करत आहे. कॉर्नवॉलमधील एका शेतात घेण्यात आलेल्या चाचणीत मिथेनवर चालणारा हा ट्रॅक्टर नियमित ट्रॅक्टरच्या गतीने चालत असल्याचे सिद्ध झाले. या ट्रॅक्टरचा वापर करून एका वर्षात कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन २ सहस्र ५०० मेट्रिक टनांवरून ५०० मेट्रिक टनांपर्यंत अल्प होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

संपादकीय भूमिका

गायीचे महत्त्व आता विदेशांतही सिद्ध होऊ लागले आहे. हे लक्षात घेऊन भारत सरकार गोहत्या रोखून गोधनाच्या संवर्धनासाठी पावले उचलणार का ?