रशियाच्या शस्त्रसाठ्यामध्ये ७५ टक्के घट झाल्याने आक्रमणाची धार बोथट ! – अमेरिकेचा दावा

वॉशिंग्टन (अमेरिका) – रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून चालू असलेल्या युद्धाला आता एक वर्ष होत आले आहे. अद्यापही हे युद्ध थांबू शकलेले नाही आणि थांबण्याची चिन्हेही दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने दावा केला आहे की, रशियाच्या शस्त्रसाठ्यामध्ये ७५ टक्के घट झाली आहे. त्यामुळे रशिया आता अल्प प्रमाणात आक्रमणे करू शकतो. त्याच्या आक्रमणाची धार आता बोथट होऊ लागली आहे. दुसरीकडे युक्रेनला नाटो देशांकडून गेले वर्षभर शस्त्र पुरवण्यात येत असल्याने तो अद्यापही रशियासमोर तग धरून राहिला आहे.

अमेरिकेचे म्हणणे आहे की, रशियाने आतापर्यंत क्रूझ आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर केला होता; मात्र आता शस्त्रसाठ्यामध्ये घट होऊ लागल्याने तो जुनी शस्त्रे वापरत आहे. ४० वर्षे जुनी असलेली शस्त्रे आता वापरली जात आहेत. पूर्वी रशिया प्रतिदिन २० सहस्र गोळ्यांचा मारा करत होता आणि ही संख्या ५ सहस्र झाली आहे.