सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सनातन आश्रम यांच्‍याप्रती भाव असलेले ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचे वाई (सातारा) येथील कै. वसंतराव सूर्यवंशी (वय ९३ वर्षे) !

‘२५.१२.२०२२ (पौष शुक्‍ल द्वितीया) या दिवशी वसंतराव सूर्यवंशी (वय ९३ वर्षे) यांचे निधन झाले. ६.१.२०२३ या दिवशी त्‍यांच्‍या निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्‍यानिमित्त त्‍यांची मुलगी आणि नात यांना त्‍यांची लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये अन् त्‍यांच्‍या निधनानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

कै. वसंतराव सूर्यवंशी
कै. वसंतराव सूर्यवंशी

१. सौ. सुनंदा जाधव (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय ६१ वर्षे), (कै. वसंतराव सूर्यवंशी यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सौै. सुनंदा जाधव

१ अ. आनंदी : ‘मी बाबांना ‘‘तुम्‍ही कसे आहात ?’’, असे विचारल्‍यावर ते सांगायचे, ‘‘मी चांगला आहे.’’

१ आ. सनातन संस्‍थेच्‍या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ करणे : ‘‘वाईला सत्‍संग चालू आहे’’, असे मी बाबांना सांगितल्‍यावर त्‍यांनी सत्‍संगात जायला आरंभ केला. ते नामजप करू लागले. ते साप्‍ताहिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार झाले. त्‍यांना नमस्‍कार केल्‍यावर ते लगेच ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असे म्‍हणत असत.

१ इ. ‘स्‍वतः योग्‍य प्रकारे नामजप करत आहे ना ?’, हे विचारून घेणे : त्‍यांना कधी त्रास झाल्‍यास ते लगेच भ्रमणभाष करून मला नामजप विचारत असत. ‘नामजप केल्‍याने त्रास न्‍यून झाला’, असे ते मला तत्‍परतेने कळवत असत. नंतर ‘ते करत असलेला नामजप योग्‍य प्रकारे होत आहे ना ?’, हे समजण्‍यासाठी ते मला भ्रमणभाषवरून नामजप म्‍हणून दाखवत असत.

१ ई. साधकत्‍व : ते सांगायचे, ‘‘आपण साधना करतो, तर आपण रागवायला नको. आपण कुणाविषयी वाईट बोलायला नको.’’ ते प.पू. भक्‍तराज महाराज यांचे एखादे वचन सांगत असत.

१ उ. सनातनची उत्‍पादने मिळाल्‍यावर पुष्‍कळ आनंद होणे : वाई येथील सनातनच्‍या साधिका ‘सनातन प्रभात’ नियतिकालिके, सात्त्विक उत्‍पादने, सनातन पंचांग इत्‍यादी द्यायला घरी आल्‍यावर त्‍यांना पुष्‍कळ आनंद होत असे. ते मला लगेच भ्रमणभाष करून त्‍याविषयी आनंदाने सांगत असत.

१ ऊ. आश्रमाप्रती भाव

१ ऊ १. ‘मुलगी आश्रमात रहात असल्‍याने ती आनंदीच असणार’, असा भाव असणे : मला भ्रमणभाष केल्‍यावर ते विचारायचे, ‘‘तू कशी आहेस ?’’ नंतर ते लगेच म्‍हणायचे, ‘‘मी असे विचारणे, ही माझी चूक आहे. तू आश्रमात रहातेस. त्‍यामुळे तू आनंदीच असणार. पाहुण्‍यांना (माझे यजमान सद़्‍गुरु नंदकुमार जाधव यांना) सांग, ‘आमच्‍याकडे लक्ष असू द्या.’’

१ ऊ २. प्रतिदिन सूक्ष्मातून रामनाथी आश्रमाचे दर्शन घेणे : बाबा मला सांगायचे, ‘‘श्रीकृष्‍ण मला प्रतिदिन सूक्ष्मातून रामनाथी आश्रमाच्‍या प्रवेशद्वारापर्यंत पोचवतो. मी आश्रमाच्‍या समोर बसून नामजप करतो. माझी आश्रमात येण्‍याची पात्रता नाही. मी तेवढी साधना करत नाही. मी आश्रमाला नमस्‍कारकरून परत येतो.’’

१ ए. संतांप्रती भाव

१. ते प्रतिदिन झोपण्‍यापूर्वी प.पू. भक्‍तराज महाराज, त्‍यांचे शिष्‍य परात्‍पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, तसेच सद़्‍गुरु आणि संत यांचे स्‍मरण करत असत.

२. महर्षींनी जीवनाडीपट्टीत सांगितल्‍यानुसार ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले’, असे न संबोधता ‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले’, असे म्‍हणायचे आहे’, असे समजल्‍यावर त्‍यांनी मला विचारून त्‍यानुसार ते तसे संबोधू लागले.

१ ऐ. बाबांच्‍या निधनानंतर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

१. त्‍यांच्‍या निधनाच्‍या वेळी आम्‍ही तेथे नव्‍हतो. आम्‍ही ‘व्‍हिडिओ कॉल’वर त्‍यांच्‍या पार्थिवाचे दर्शन घेतल्‍यावर मला त्‍यांचा चेहरा तेजस्‍वी दिसत होता.

२. त्‍यांच्‍या बोटांची मुद्रा होती.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या कृपेने मला असे वडील मिळाले. त्‍याबद्दल त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञता !’

२. सौ. गायत्री आदित्‍य शास्‍त्री (कै. वसंतराव सूर्यवंशी यांची नात (मुलीची मुलगी)), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सद्गुरु नंदकुमार जाधव
सौ. गायत्री शास्‍त्री

२ अ. धार्मिक वृत्ती : ‘आजोबा धार्मिक वृत्तीचे होते. ते प्रतिदिन घरातील देवपूजा केल्‍यानंतर घराजवळील कुलदेवाच्‍या मंदिरात जायचे.

२ आ. स्‍वावलंबी : ते वयाच्‍या ९३ व्‍या वर्षीही स्‍वतःची सर्व कामे स्‍वतः करायचे. आजोबांची खोली वरच्‍या माळ्‍यावर होती. ते दिवसातून २ – ३ वेळा जेवण्‍यासाठी आणि आवरण्‍यासाठी खाली यायचे.

२ इ. नामजपादी उपाय करणे : माझी आई त्‍यांना नामजपादी उपाय करायला सांगायची, आजोबा ते सर्व उपाय करायचे. ‘मुलगी जे सांगते, ते माझ्‍या भल्‍यासाठी आहे’, अशी त्‍यांची श्रद्धा होती.

२ ई. साधनेबद्दल सकारात्‍मक असणे : ‘आपली मुलगी, जावई आणि नाती जी साधना करतात, ती योग्‍य आहे’, हे त्‍यांच्‍या लक्षात आले होते. त्‍यामुळे ते नेहमी साधनेविषयी सकारात्‍मक बोलायचे. ते अधिक वेळ साधनेविषयी बोलायचे.

२ उ. सद़्‍गुरु नंदकुमार जाधव यांच्‍या प्रती भाव : त्‍यांच्‍या मनात सद़्‍गुरु बाबांबद्दल (सद़्‍गुरु नंदकुमार जाधव यांच्‍याबद्दल) पुष्‍कळ भाव होता. आजोबांची प्रकृती बरी नसल्‍याने आम्‍ही त्‍यांना मार्च मासात भेटायला गेलो होतो. तेव्‍हा आजोबांनी सद़्‍गुरु बाबांना वाकून नमस्‍कार केला.

२ ऊ. आजोबांच्‍या निधनानंतर : त्‍यांच्‍या पार्थिवाचे ‘व्‍हिडिओ कॉल’वर दर्शन घेतल्‍यावर मला त्‍यांचा चेहरा पुष्‍कळ शांत आणि समाधानी दिसत होता.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक (२८.१२.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक