उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये भूमी खचत असल्याने ५०० हून अधिक घरांना तडे

  • ६६ कुटुंबांचे स्थलांतर

  • नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडच्या चमोली येथील जोशीमठमध्ये भूमी खचल्यामुळे ५६१ घरांना, तसेच रस्त्यांनाही तडे गेले आहेत. भूमी खचण्यासह येथून मातीचा गाळ असलेले पाणी वाहू लागल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाल्याने तेथून आतापर्यंत ६६ कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. जोशीमठ येथील आशियातील सर्वांत लांब ‘रोप वे’ (डोंगराळ परिसरातील लोकांची ने-आण करण्यासाठीची यंत्रणा) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना वाचवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याच्या सूचना मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याकडून प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी या भागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. जोशीमठ हे हिमालय पर्वतरांगेत अलकनंदा नदीच्या काठावर वसले आहे.

१. जोशीमठच्या मुख्य टपाल कार्यालयाला तडे गेले आहेत. त्यानंतर ते दुसर्‍या ठिकाणी हालवण्यात आले आहे. ज्योर्तिमठ संकुल आणि लक्ष्मी नारायण मंदिर यांच्या आजूबाजूच्या इमारतींना मोठ्या भेगा पडल्या आहेत. हा संपूर्ण प्रकार पाहून प्रशासनाने हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. आपद्ग्रस्त नागरिकांना ८१७१७४८६०२ वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

२. ‘जोशीमठ बचाव संघर्ष समिती’ने ५ जानेवारी या दिवशी बाजार बंद ठेवण्याची घोषणा केली होती. लोक संतप्त असून प्रशासनाच्या कामांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत आहेत. जनतेने ४ जानेवारी या दिवशी मशाल मिरवणूक काढून निषेध व्यक्त केला. ‘ठिकठिकाणी पाणी येत आहे. घरांमध्ये तडे जात आहेत; पण सरकार काहीच करत नाही. ते थांबवण्यासाठी सरकारने महत्त्वाची पावले उचलावीत’, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

पाणी येेणे आणि तडे जाणे यांमागे मानवनिर्मित आणि नैसर्गिक कारणे !

भूगर्भशास्त्रज्ञ, अभियंते आणि सरकारी अधिकारी यांच्या ५ सदस्यीय पथकाने या भागाची पडताळणी केली. जोशीमठमधील अनेक भाग मानवनिर्मित आणि नैसर्गिक कारणांमुळे पाण्याखाली गेल्याचे या पथकाला आढळून आले. भूस्खलनाचे कारण म्हणजे झाडे आणि पर्वत तोडणे हे आहे. जोशीमठच्या जवळपास सर्वच प्रभागांमध्ये नियोजन न करता खोदकामही चालू असून त्यामुळे घरे आणि दुकाने यांना तडे जात आहेत.