१. कु. कनक भारद्वाज, धनबाद, झारखंड.
१ अ. सद्गुरु नीलेशदादांना पाहून मन शांत होणे : ‘सद्गुरु दादांकडे पहाताच माझे मन शांत होते. त्यांची प्रत्येक कृती माझ्या मनाला पुष्कळ शीतलता देते.
१ आ. प्रेमभाव
१ आ १. गोव्यात सद्गुरु नीलेशदादांशी भेट झाल्यावर त्यांनी वाराणसी आश्रमातील काही वैशिष्ट्ये सांगून साधिकेला तिथे अगत्याने बोलावणे : गोव्यात एकदा माझी सद्गुरु नीलेशदादांशी भेट झाली. ते त्यांच्या सेवेत व्यस्त असूनही त्यांनी मला ३० मिनिटांपेक्षाही अधिक वेळ दिला. नंतर त्यांनी ‘मला सर्व समजले आहे ना ?’, याची निश्चितीही करून घेतली. मी वाराणसी आश्रमात एकदाही आले नसल्याचे समजल्यावर ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही वाराणसीला नक्की या. तुमच्यासाठी आश्रमाची दारे सदैव उघडी आहेत.’’ त्यांनी मला तेथील काही वैशिष्ट्येही सांगितली. तेव्हा मला त्यांच्याविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली.
१ आ २. प्रेमाने प्रकृतीची विचारपूस करणे : सद्गुरु दादांना ‘माझी प्रकृती बरी नव्हती’, असे समजले. त्यानंतर जेव्हा ते भेटायचे, तेव्हा प्रत्येक वेळी माझ्या प्रकृतीची आवर्जून विचारपूस करायचे. मला आध्यात्मिक त्रास व्हायचा. तेव्हा ते मला नामजपादी उपाय सांगायचे आणि नंतर त्रास न्यून झाल्याची निश्चितीही करायचे.
१ इ. अल्प अहं : एकदा आमचे बोलणे झाल्यानंतर ते स्वतःहून मला म्हणाले, ‘‘तुमच्याशी बोलून मला चांगले वाटले.’’ त्या वेळी ‘सद्गुरु कौतुक करतात; परंतु माझ्यात किती अहं आहे’, असे मला वाटले. कोणी मला कधी अडचणींविषयी विचारले, तर ‘मला सर्व ठाऊक आहे; म्हणून ते मला विचारत आहेत’, असा अहंयुक्त विचार माझ्या मनात येत असतो.
‘ईश्वराच्या कृपेनेच आम्हाला सद्गुरु दादा साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शनासाठी लाभले आहेत. त्याबद्दल कृतज्ञता ! आम्हाला त्यांच्याप्रमाणे तळमळीने साधना करता येऊ दे’, अशी त्यांच्या सुकोमल चरणी प्रार्थना आहे.’ (२.७.२०२२)
२. सौ. मीनू खैतान, धनबाद, झारखंड.
२ अ. सदैव विनम्र भावात असणे : ‘मी सद्गुरु नीलेशदादांशी बोलतांना त्यांच्यात एवढा विनम्र भाव असतो की, त्यांच्याशी नम्रपणे बोलण्यास मीच न्यून पडते.
२ आ. ते आमची प्रत्येक अडचण अत्यंत प्रेमाने सोडवतात.
२ इ. शिकण्याची स्थिती : ते नेहमीच शिकण्याच्या स्थितीत असतात. एकदा मी त्यांना म्हणाले, ‘‘ऑनलाइन’ हिंदी पाक्षिक वाचतांना मला स्वभावदोषांच्या संदर्भात करायची प्रार्थना मिळाली आहे. या प्रार्थनेचा मला लाभ होत आहे.’’ तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘मलाही ती प्रार्थना पाठवून द्या.’’
३. कुमारी एकता राम, देवघर, झारखंड.
३ अ. स्वतःहून साधकांशी बोलणे : ‘सद्गुरु नीलेशदादांच्या अनेक गुणांपैैकी नम्रता हा एक त्यांचा मोठा गुण आहे. मी त्यांच्याशी अत्यल्प वेळा बोलले आहे; कारण मला इतरांशी बोलायला संकोच वाटतो. शिबिराच्या वेळी मला पाहिल्यावर ते स्वतःच माझ्याजवळ येऊन माझ्याशी बोलले. तेव्हा ‘सद्गुरु असूनही ते स्वतःहून माझ्याशी बोलायला आले’, असे माझ्या लक्षात आले.
३ आ. सद्गुरु नीलेशदादांच्या चरणांतून पुष्कळ चैतन्य आणि शक्ती मिळून भाव जागृत होणे : एका शिबिरात सूत्रसंचालन सेवेच्या वेळी मी त्यांच्या जवळ बसले होते. तेव्हा माझी दृष्टी वारंवार त्यांच्या चरणांवर पडत होती आणि मला चरणांतून पुष्कळ चैतन्य अन् शक्ती मिळत होती. त्या वेळी माझा भाव जागृत होत होता.
४. सौ. रेणु सिंह, धनबाद, झारखंड.
४ अ. इतरांना समजून घेऊन प्रसंगोचित मार्गदर्शन करणे : ‘आमच्या घरात कौटुंबिक, आर्थिक आणि आध्यात्मिक अडचणी पुष्कळ वाढल्या आहेत. याविषयी मी सद्गुरु दादांकडून मार्गदर्शन घेतले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘परिस्थितीच ईश्वर असल्याने त्याला अधिकाधिक प्रार्थना करा. त्या परिस्थितीत ‘ईश्वराप्रती श्रद्धा, भाव आणि भक्ती कशी वाढवायची ? योग्य क्रियमाण कसे वापरायचे ?’, हे पहा. ‘ईश्वर न्यायप्रिय आहे. तो कुणावरही अन्याय होऊ देत नाही’, असा विचार करून आपण आपल्या मनातील श्रद्धा दृढ करण्याचा प्रयत्न करावा !’’
५. सौ. मेघा पातेसरिया, रानीगंज, बंगाल.
५ अ. प्रेमाने बोलून आधार देणारे सद्गुरु नीलेश सिंगबाळ ! : ‘जानेवारी २०२० मध्ये माझ्या सासरी रानीगंजमध्ये माझे मामेसासरे कुटुंबियांसह आले होते आणि तेव्हा माझे सासू-सासरे बाहेर गेले होते. अकस्मात् माझ्या मामेसासर्यांचे निधन झाले. या प्रसंगाने माझे मन पुष्कळ अस्वस्थ झाले. मला पुष्कळ रडू येऊ लागले. तेव्हा गुरुदेवांच्या कृपेने सद्गुरु नीलेशदादा कतरासमध्येच होते. ते माझ्याशी बोलले आणि त्यांनी सहजपणे अन् प्रेमाने मला समजावले. त्यांच्याशी बोलताच माझे मन पूर्ण शांत आणि स्थिर झाले. माझ्या मनात जे नकारात्मक आणि चिंतेचे विचार होते, ते सर्व नाहीसे झाले. सद्गुरु नीलेशदादा माझ्यासाठी मोठा आधारस्तंभच आहेत !’
(सर्व सूत्रांचा दिनांक जुलै २०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |