(म्हणे) ‘धार्मिक कार्यक्रम करण्यास लादलेली बंदी हटवा, अन्यथा उपोषण करणार !’ – ‘बिलिव्हर्स’चे पास्टर डॉम्निक यांच्या समर्थकांची चेतावणी

प्रशासनाने ‘बिलिव्हर्स’ना धार्मिक कार्यक्रम करण्यास बंदी घातल्याचे प्रकरण

‘बिलिव्हर्स’चा पास्टर डॉम्निक आणि सोबत त्याची पत्नी

पणजी, ३१ डिसेंबर (वार्ता.) – उत्तर गोवा जिल्हा प्रशासनाने धार्मिक कार्यक्रम करण्यास लादलेली बंदी हटवावी, अन्यथा उपोषण करणार असल्याची चेतावणी ‘बिलिव्हर्स’चे पास्टर डॉम्निक यांच्या काही समर्थकांनी ३१ डिसेंबर या दिवशी पणजी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली.

(सौजन्य : prime media goa) 

फसवणूक करून धर्मांतर केले जात असल्याच्या वाढत्या तक्रारीनंतर उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी २८ डिसेंबर २०२२ या दिवशी बिलिव्हर्सच्या सडये, शिवोली येथील फाईव्ह पिलर्स चर्चचे पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जॉन डिसोझा यांना चर्चमध्ये धार्मिक कार्यक्रम करण्यास फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अंतर्गत बंदी घातली आहे. उत्तर गोव्याच्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या अहवालाच्या आधारावर उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी ही बंदी घातली आहे.

पोलीस अधीक्षकांनी अहवालात मांडलेली सूत्रे

उत्तर गोव्याच्या पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या अहवालात पुढील सूत्रे मांडली होती. सडये, शिवोली येथील ट्रोपावाडो येथे डॉम्निक डिसोझा आणि त्याची पत्नी करत असलेल्या धर्मांतराला नागरिक अन् कार्यकर्ते विरोध करत असल्याने तेथे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. प्रार्थना आणि ‘हिलिंग’ यांच्या नावाने डॉम्निक दांपत्य धर्मांतर करत असल्याने गावात धार्मिक तणाव निर्माण होत आहे. डॉम्निक दांपत्याची पार्श्वभूमी जातीयवादी आहे आणि त्यांच्या विरोधात म्हापसा पोलीस ठाण्यात फौजदारी स्वरूपाचे गुन्हे प्रविष्ट झालेले आहेत. सर्वाेच्च न्यायालयाने हल्लीच एका निवाड्यात बलपूर्वक आणि फसवणूक करून धर्मांतर केल्याच्या घटनांना राष्ट्रीय सुरक्षेवर आणि लोकांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचे म्हटले आहे.

(म्हणे) ‘आमचा घटनात्मक अधिकार हिरावून घेतला !’

पत्रकार परिषदेत पास्टर डॉम्निक यांचे समर्थक म्हणाले, ‘‘आम्ही ख्रिस्ती आहोत आणि जमावबंदी आदेश लावून आमचा घटनात्मक अधिकार हिरावून घेतला आहे. (ख्रिस्ती आहेत म्हणणारे हिंदूंना तेथील कार्यक्रमांना का बोलावतात ? त्यांना लांबच्या गावांतून वाहनद्वारे का आणतात ? त्यांना आमिषे का दाखवतात ? – संपादक) गोवा सरकार भेदभाव का करत आहे ? आम्हाला कुणावरही श्रद्धा ठेवण्याचे स्वातंत्र्य आहे. सडये, शिवोली येथील ‘बिलिव्हर्स’च्या चर्चमध्ये गेली २० वर्षे लोक जात आहेत आणि त्या ठिकाणी काहीच अनधिकृत होत नाही. ‘बिलिव्हर्स’च्या विरोधात केलेल्या सर्व तक्रारी बनावट आहेत.’’

संपादकीय भूमिका

प्रशासनाने ‘बिलिव्हर्स’च्या धमक्यांना भीक न घालता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर रहावे ! हिंदू सहिष्णू असल्याने अनेक हिंदूंचे आमिषे दाखवून आणि फसवणूक करून धर्मांतर झाले, तरी हिंदूंनी वैध मार्गाने धर्मांतराच्या विरोधात आवाज उठवला. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहिली, हे लक्षात घ्यावे !