पुणे, १ जानेवारी (वार्ता.) – शहरातील सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते वडगाव पूल दरम्यान उड्डाणपुलाचे काम चालू आहे. हा रस्ता अत्यंत रहदारीचा असल्याने या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी ही नित्याची गोष्ट झाली आहे. रस्त्याने ये – जा करणार्या चाकरमान्यांना प्रतिदिन मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत सिंहगड रस्त्यावर मोठ्या आणि जड वाहनांना बंदी घालावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचे प्रदेश सरचिटणीस श्री. विश्वजीत देशपांडे यांनी पोलीस निरीक्षक आणि वाहतूक विभाग यांना पत्र लिहून केली आहे. त्याचसह या रस्त्यावरची वाहतूक समस्या सोडवण्यासाठी खालील उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
१. राजाराम पूल ते वडगाव पूल येथे सकाळी ९ ते ११ आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत मोठे ट्रक, बांधकाम साहित्यांची वाहतूक करणारी वाहने, सिमेंट मिक्सर ट्रक या सर्व मोठ्या वाहनांना बंदी करण्यात यावी.
२. सिंहगड (नरवीर तानाजी मालुसरे) रस्त्यावर सर्व चौकात तात्काळ वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी.
३. सिंहगड (नरवीर तानाजी मालुसरे) रस्त्यावर संतोष हॉल चौक आणि ब्रह्मा हॉटेल चौक हे अत्यंत वर्दळीचे चौक असून या चौकांना जोडणारे अंतर्गत रस्ते अत्यंत छोटे आहेत. त्यामुळे संतोष हॉल चौक, माणिकबाग, ब्रह्मा हॉटेल चौक असा वर्तुळाकार एकेरी रस्ता करावा.
४. सिंहगड (नरवीर तानाजी मालुसरे) रस्त्यावरील सर्व सिग्नलवरचे पादचार्यांसाठीचे ‘झेब्रा क्रॉसिंग’चे पांढरे पट्टे पूर्णतः पुसले गेले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या समन्वयाने ‘झेब्रा क्रॉसिंग’ व्यवस्थित केल्यास नागरिकांना मोठे साहाय्य होईल.
५. सिंहगड (नरवीर तानाजी मालुसरे रस्ता) रस्त्यावर तसेच आतील रस्त्यांवर अनधिकृत भाजीवाले / पथारी व्यावसायिक आपली दुकान आणि गाड्या लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत, या लोकांचा तात्काळ बंदोबस्त करावा.