वर्ष २०२२ मध्ये काश्मीरमध्ये १७२ आतंकवादी ठार !

  • २६ सैनिक वीरगतीला प्राप्त

  • आतंकवाद्यांच्या आक्रमणात २९ नागरिकांचा मृत्यू

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – सुरक्षादलांनी वर्ष २०२२ मध्ये विदेशातील ४२  आतंकवाद्यांसह १७२ आतंकवाद्यांना ठार मारलेे. यासह भारताचे २६ सैनिक वीरगतीला प्राप्त झाले. अतिरिक्त पोलीस महासंचालक विजयकुमार यांनी ही माहिती दिली. ठार झालेल्यांमध्ये ‘टी.आर्.एफ्.’ आणि ‘लष्कर-ए-तोयबा’चे ३५ आतंकवादी, ‘जैश-ए-महंमद’चे ३२, तर ‘हिज्बुल मुजाहिदीन’चे ३२ आतंकवादी ठार झाले. त्यांच्याकडून ३६० शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

१. वर्ष २०२२ मध्ये रस्त्यावरील हिंसाचार, दगडफेक, इंटरनेट बंद रहाण्याचे प्रमाण यांपैकी कोणतीही गोष्ट काश्मीरमध्ये घडलेली नाही.

२. वर्ष २०२२ मध्ये विविध संघटनांमध्ये ६५ नवे आतंकवाद्यांची भरती झाली आहे. त्यांपैकी ५८ आतंकवाद्यांना ठार मारण्यात आले आहे.

३. आतंकवाद्यांच्या गोळीबारात २९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमधील २१ जण स्थानिक असून त्यापैकी ६ जण हिंदूू आणि १५ जण मुसलमान होते. ८ जण बाहेरील राज्यातून काश्मीरमध्ये आले होते.

४. वर्ष २०१६ मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या घटनांच्या २ सहस्र ८९७ प्रकरणांवरून वर्ष २०२२ मध्ये ही संख्या २६ वर आलेली आहे. विविध कारवायांमध्ये सहभागी असलेल्या १ सहस्र ५६० जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी विविध ठिकाणी छापे मारून ११.८ किलो ब्राऊन शुगर, ४६ किलो हेरॉइन आणि २०० किलो चरस जप्त केले आहे.

संपादकीय भूमिका

काश्मीरमध्ये प्रतिवर्षी १०० हून अधिक आतंकवादी ठार होत असले, तरी त्यांची निर्मिती पाकिस्तानमध्ये चालूच असल्याने काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होत नाही. त्यामुळे तो मुळासह नष्ट करण्यासाठी पाकिस्तानला नष्ट करणे आवश्यक आहे !