(म्हणे) ‘कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी आपण आणखी एकदा प्रयत्न करूया !’

शी जिनपिंग यांचे चिनी नागरिकांना आवाहन !

बीजिंग (चीन) – अधिकारी, जनता, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आदी सर्वजण कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी कटीबद्ध आहेत. हा साथीचा रोग रोखण्यासाठी आणि नियंत्रण करण्यासाठी आणखी काम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्वजण श्रम घेत आहेत. आपल्यासमोर आशेचा किरण दिसत आहे. चिकाटी आणि एकजूट म्हणजे विजय पक्का, या संकटावर मात करण्यासाठी आपण आणखी एकदा प्रयत्न करूया, असे आवाहन चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चिनी जनतेला ख्रिस्ती नववर्षाच्या पूर्वसंधेला उद्देशून केलेल्या भाषणात केले.

शी जिनपिंग म्हणाले की, कोरोना आल्यापासून आम्ही लोकांच्या जीविताच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. आम्ही शक्य तितक्या प्रमाणात लोकांच्या जीवनाचे आणि आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. देशाने मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्या जात आहेत. सरकारने ३ वर्षांपासून चालू असलेले ‘शून्य कोविड धोरण’ही संपवले आहे. वर्ष २०२२ मध्ये आपण भूकंप, पूर, दुष्काळ आणि जंगलातील आग यांसह अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना केला आहे. या अडचणींचा सामना करण्यासाठी आम्ही संघटित राहिलो.

संपादकीय भूमिका 

कोरोना महामारी संपुष्टात आणण्यासाठी जनतेवर अमानवी निर्बंध लादणारे शी जिनपिंग यांच्यावर तेथील जनता कशी विश्‍वास ठेवणार ?