मुंबईत ‘सेक्सटॉर्शन’द्वारे धमकावण्याच्या प्रकारांमध्ये वाढ : मासाला सरासरी २५ गुन्ह्यांची नोंद !

गुन्हे उघड होण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प !

(‘सेक्सटॉर्शन’ म्हणजे लैंगिक व्हिडिओ काढून युवक किंवा युवती यांना ते उघड करण्याची धमकी देऊन त्यांचे आर्थिक आणि लैंगिक शोषण केले जाणे)

मुंबई, २५ डिसेंबर (वार्ता.) – सामाजिक प्रसारमाध्यमांचा दुरुपयोग करून युवक-युवतींना ‘ब्लॅकमेलिंग’ करण्याच्या घटना महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहेत.  ‘सेक्सटॉर्शन’च्या माध्यमातून आर्थिक आणि लैंगिक फसवणुकीचे महाराष्ट्रात प्रतिमासाला सरासरी २५ गुन्हे नोंद होत आहेत. मुंबईमध्ये जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ‘सेक्सटॉर्शन’चे सर्वाधिक ६८ गुन्हे नोंदवण्यात आले; मात्र यांतील केवळ १६ गुन्ह्यांचा तपास लागला.

महाराष्ट्रात जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ‘सेक्सटॉर्शन’चे २२९ गुन्हे झाले. यांमध्ये १७२ आरोपींना अटक झाली. मुंबईतील लोअर परळ येथे काही दिवसांपूर्वी एका युवतीने तरुणाला ‘फेसबुक’द्वारे ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ (सामाजिक माध्यमांवर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करण्यासाठी पाठलेला संदेश) पाठवून त्याच्याशी ‘चॅटिंग’ (सामाजिक माध्यमांवर संदेशाद्वारे साधलेला संवाद) चालू केले. त्यानंतर ‘वॉट्सअ‍ॅप’द्वारे अश्‍लील संवाद साधून ‘व्हिडिओ कॉल’ करून युवकाचे अश्‍लील चाळे युवतीने रेकॉर्ड केले. हे व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन युवकाला धमकावून वारंवार पैशांची मागणी केली. युवकाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यावर या प्रकरणी पोलिसांनी राजस्थानातून ३ जणांना अटक केली. काही दिवसांपूर्वी अंधेरी येथेही विद्यार्थ्याचे नग्नावस्थेतील व्हिडिओ कॉल ‘रेकॉर्ड’ करून त्याच्याकडून ३३ सहस्र रुपये उकळण्याची घटना घडली. मुंबईमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही अशा प्रकारच्या धमक्या देत असल्याच्या तक्रारी दिल्या आहेत.

‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘इन्स्टाग्राम’, ‘व्हॉट्सअ‍ॅप’ या सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे होणारे हे फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी राज्य सायबर विभागाने ‘www.cybercrime.gov.in’ या ‘पोर्टल’ वर तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यांतही हे प्रकार झपाट्याने वाढत आहेत.

कशी होते ‘सेक्सटॉर्शन’द्वारे फसवणूक ?

‘फेसबुक’, ‘ट्विटर’, ‘इन्स्टाग्राम’ यांवरून संदेशद्वारे किंवा ‘व्हॉट्सअ‍ॅप’ वरून व्हिडिओ कॉलद्वारे अनोळखी व्यक्तीशी संपर्क साधला जातो. यामध्ये वेगवेगळ्या ‘सॉफ्टवेअर’चा उपयोग करून व्हिडिओ कॉल केलेल्या व्यक्तीच्या शरीरावरील कपडे पुसून त्यांना नग्न दाखवले जाते. हे व्हिडिओ संबंधित व्यक्तीला पाठवून सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली जाते आणि तसे न करण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. यासाठी बहुतांश वेळा सुंदर दिसणार्‍या युवतींच्या छायाचित्रांचा उपयोग केला जातो. अनोळखी व्यक्तीकडून आलेले व्हिडिओ कॉल न उचलणे, अशा प्रकारचा कॉल चुकून उचलला गेल्यास त्वरित बंद करणे, सामाजिक माध्यमांवर अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या उत्तेजक संदेशांना बळी न पडणे, फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलिसांकडे तक्रार करणे या गोष्टी गांभीर्याने पाळल्यास सामाजिक प्रसारमाध्यमांद्वारे होणारी फसवणूक टाळता येईल.