परात्पर गुरु डॉ. आठवले यांना माता-पिता, बंधु आणि सखा, अशा रूपांत अनुभवणारी कु. सायली देशपांडे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना माता-पिता, बंधु आणि सखा, अशा रूपांत अनुभवणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. सायली देशपांडे (वय १४ वर्षे) !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘माता आणि पिता’ यांच्या रूपात अनुभवणे

‘२०.५.२०२१ या दिवशी कोरोनासंसर्गामुळे माझ्या वडिलांचे (रवींद्र अंबादास देशपांडे यांचे) निधन झाले. त्या वेळी मी प्रथमच परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अंतर्मनापासून आळवले. तेव्हा ‘गुरुमाऊलीच माझ्या जीवनाचा आधार असून तेच माझे माता-पिता आहेत. अन्य सर्व माया आहे’, याची मला जाणीव झाली. त्या वेळी मी श्री गुरूंना माता आणि पिता या रूपांत अनुभवले. तेव्हा मला गुरूंचाच आधार होता; म्हणूनच मला त्या प्रसंगात स्थिर रहाता आले.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना बंधूच्या रूपात अनुभवणे

कु. सायली देशपांडे

५.९.२०२१ या दिवशी मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर मी आश्रमातील माझ्या कुटुंबियांविना कुणालाच ओळखत नव्हते. त्यामुळे मी कुणाशीच अधिक बोलत नसे. मी मनातील सर्वकाही सूक्ष्मातून गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) सांगत असे. मी लहान लहान गोष्टीही सूक्ष्मातून त्यांना विचारून करत असे. माझ्या संदर्भात काही चांगले झाले किंवा माझ्याकडून काही चूक झाली, तरी मी गुरुदेवांनाच सांगायचे. त्या वेळी मला श्री गुरूंना (परात्पर गुरु डॉक्टरांना) बंधूच्या रूपात अनुभवता आले.

३. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितलेल्या चुका स्वीकारतांना संघर्ष झाल्यावर मनाची प्रक्रिया सूक्ष्मातून गुरुदेवांना सांगणे, त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलणे आणि गुरुदेवांना ‘सखा’ या रूपात अनुभवणे

आश्रमात असतांना काही कालावधीनंतर माझ्यातील स्वभावदोष आणि अहं उफाळून आल्यामुळे काही प्रसंग घडत असत. व्यष्टी साधनेच्या आढाव्यातही मला माझ्या अनेक चुका लक्षात आणून दिल्या जायच्या. तेव्हा माझ्याकडून काही चुका सहजतेने स्वीकारल्या जायच्या; तर काही चुका स्वीकारतांना माझा संघर्ष होत असे. त्या वेळी माझ्या मनाची होणारी प्रक्रिया मी सूक्ष्मातून गुरुदेवांना सांगत असे. मी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलायचे. काही वेळा मी सूक्ष्मातून त्यांच्या कुशीत शिरून रडत असे. त्या वेळी मला त्यांना ‘सखा’ या रूपात अनुभवता आले.

सर्वव्यापी आणि सर्वेश्वर अशा परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ‘माता-पिता, बंधु आणि सखा’ अशी विविध रूपे मला अनुभवता आली. त्याबद्दल मी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– कु. सायली देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.८.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.