घरच्या लागवडीत वाफे किंवा कुंड्या यांमध्ये हळदीच्या कंदांची लागवड करून ४ जणांच्या कुटुंबाला वर्षभर पुरेल इतके हळदीचे उत्पन्न सहज घेता येते. साधारणपणे अक्षय्य तृतीयेपासून (साधारण १५ एप्रिलनंतर) मे मासाच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ही लागवड केली जाते. भूमीखाली हळदीच्या कंदांची वाढ होऊन ते परिपक्व होण्यास साधारण ८ ते ९ मासांचा कालावधी लागतो. पारंपरिक शेतीमध्ये पौष मासाला (डिसेंबर – जानेवारी मासात) आरंभ झाल्यानंतर हळद काढणी करण्याची पद्धत आहे. आजच्या लेखात ‘हळद काढणी आणि त्यानंतर घरच्या घरी हळदीची पूड कशी करावी ?’, याविषयी जाणून घेऊया.
१. ‘हळदीचे कंद काढण्यायोग्य झाले आहेत’, हे ओळखणे आणि ते काढणे
‘हळदीचे कंद काढण्यायोग्य झाले की, हळदीची पाने पिवळी होऊ लागतात आणि रोपे भूमीवर आडवी होतात. अशा वेळी या रोपांना पाणी देणे थांबवावे आणि १ – २ दिवसांनी सुकलेले वरचे रोप कापून टाकावे. माती मोकळी करून हळूवारपणे कंद बाहेर काढावेत.
२. कंद स्वच्छ करणे
काढलेल्या कंदांना पुष्कळ माती चिकटलेली असते. त्यामुळे एका टबमध्ये पाणी घेऊन त्यात हे कंद बुडवून हाताने चोळून स्वच्छ करावेत. ही कृती २ – ३ वेळा करून कंद पूर्णपणे स्वच्छ करावेत. कंदाचा गड्डा मोठा असतो. मध्यभागी अंगठ्याहून जाड असा मातृकंद आणि त्याला दोन्ही बाजूंनी बोटांप्रमाणे आलेले लहान कंद अशी रचना असते. हे लहान कंद मातृकंदापासून तोडून वेगळे करावेत आणि आवश्यक असल्यास पुन्हा एकदा धुऊन घ्यावेत.
३. कंद उन्हात वाळवणे
हे स्वच्छ झालेले कंद २ दिवस उन्हात वाळवून घ्यावे. पुढील लागवडीसाठी जितके आवश्यक असतील, तितके यांतील मातृकंद आणि अन्य मोठे कंद निवडून वेगळे काढावेत. हे कंद लाकडाची किंवा गोवर्यांची राख लावून मातीच्या लहान मडक्यात भरून ठेवावेत. असे केल्याने कंदांना बुरशी लागत नाही.
४. हळदीची पूड करणे
उर्वरित कंद चिरून त्याच्या पातळ चकत्या कराव्यात आणि या चकत्या कुरकुरीत होईपर्यंत उन्हात वाळवून घ्याव्यात. हळदीच्या चकत्या उन्हात पूर्ण वाळून त्यांतील ओलावा निघून गेल्यावर त्या मिक्सरमध्ये दळून घ्याव्यात आणि बारीक चाळणीने पूड चाळून घ्यावी. ही पूड पातेल्यात काढून ते सुती कापडाने झाकावे आणि पुन्हा १ – २ दिवस उन्हात ठेवावे. असे केल्याने ओलावा पूर्णपणे निघून जातो आणि हळद खराब होत नाही. त्यानंतर स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बाटलीत ‘हळद पूड’ भरून ठेवावी. अशा प्रकारे अत्यंत सोप्या पद्धतीने घरच्या घरी हळदीची पूड करता येते. यामध्ये कुठलीही भेसळ नसल्याने औषधोपचारांतही या हळदीचा उपयोग करता येतो.
५. हळदीच्या कंदांपासून स्वतः पूड बनवण्याचे लाभ
पेठेत मिळणारी ‘हळद पूड’ ही हळदीचे कंद उकळून त्यांची साल काढून सिद्ध केली जाते, तसेच रासायनिक प्रक्रिया केली जाते. त्यामुळे हळदीला पिवळा धम्मक रंग येतो. घरी केलेली ‘हळद पूड’ पेठेतील हळदीप्रमाणे पिवळी धम्मक दिसत नसली, तरीही वरील पद्धतीमध्ये तिच्यातील औषधी गुणधर्म टिकून रहातात आणि स्वादही उत्तम मिळतो.
६. घरच्या घरी केलेल्या हळदीच्या लागवडीचा अभ्यास
अ. हळदीचे कंद लागवड केल्याचा दिनांक : वर्ष २०२१ मधील मे मासाचा शेवटचा आठवडा
आ. रोपांची संख्या : १०
इ. वाफ्याचा आकार : रुंदी – १ फूट, लांबी – २ फूट, उंची – ६ इंच
ई. काढणीचा दिनांक : २३.१.२०२२
उ. काढणीनंतर मिळालेल्या ओल्या कंदांचे वजन : ४ किलो २०० ग्रॅम
ऊ. हळदीच्या चकत्या उन्हात वाळवून नंतर मिळालेली शुद्ध हळद पूड : ६०० ग्रॅम
या आठ मासांच्या कालावधीत वाफ्यामध्ये पालापाचोळ्याचे आच्छादन करणे आणि जीवामृत देणे हे नियमितपणे केले होते. अन्य कोणत्याही खताचा उपयोग केला नव्हता.’
– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, गोवा. (२१.१२.२०२२)