पारंपरिक मित्रदेश नेपाळमध्ये सध्या सत्तापरिवर्तनाचे वारे वहात आहेत. नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या निवडणुकीत नेपाळी काँग्रेस पक्षाचे नेते शेर बहादूर देउबा यांच्या नेतृत्वाखालील नवीन सत्ताधारी आघाडीला सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली. २१ डिसेंबर या दिवशी देउबा यांनी संसदीय गटनेतेपदाची निवडणूकही जिंकली आहे. यामध्ये नेपाळचे दोन माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली आणि पुष्प कमल दहल प्रचंड यांचा समावेश असलेल्या नेपाळच्या साम्यवादी पक्षाच्या निवडणुकीतील पराभवाने चीनला धक्का बसला आहे. या दोन्ही नेत्यांशी चीनशी विशेष जवळीक होती. त्यांच्या कार्यकाळात नेपाळचे भारतासमवेतचे संबंधही ताणले गेले होते. याउलट शेर बहादूर देउबा हे भारताचे निकटवर्ती पंतप्रधान समजले जातात. ७५ वर्षीय देउबा राजकारणात धुरंधर आणि मुत्सद्दी नेते आहेत. भारत आणि नेपाळ यांच्या संबंधांत आलेली कटूता अल्प करण्याचा प्रयत्न देउबा यांनी यापूर्वी केला आहे. देउबा आणि अमेरिका यांच्यातील संबंधही चांगले आहेत. भारताच्या दृष्टीने नेपाळचे दुहेरी महत्त्व आहे. तो समान धार्मिक पार्श्वभूमी असलेला आहे. त्यासमवेतच भारताचा सध्याचा आघाडीचा शत्रू चीन नेपाळ कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. भारतासाठी नेपाळ जितका महत्त्वाचा आहे, त्याचे तितकेच महत्त्व चीनच्या दृष्टीनेही आहे.
वर्ष २०१९ मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी काठमांडू दौरा केला होता. नेपाळला चीनकडून साहाय्य म्हणून दिल्या जाणार्या रकमेतही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. नेपाळमधील पोखरा आणि लुंबिनी या नेपाळी विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कार्यातही चीनने विशेष लक्ष घातले आहे. नेपाळमधील चीनचा वाढता प्रभाव ही भारतासाठी निश्चितच डोकेदुखी ठरणार आहे. चीन नेपाळच्या भूमीचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी करतो. त्यामुळेच नेपाळशी संबंध प्रस्थापित करतांना चीनचाही विचार करावा लागतो. चीनच्या समस्येचा उपाय काढतांना तेथील राजकारणामध्ये आणि जनतेमध्ये स्वतःचा प्रभाव वाढवणे, ही भारताची प्राथमिकता आहे. अशा स्थितीत नेपाळविषयी भारताला वाटणारी आस्था मात्र दोन्ही देशांतील धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि पारंपरिक समानतेमुळे नैसर्गिकरित्या असलेली ओढ आहे. त्यात कोणतेही वर्चस्ववादाचे राजकारण नाही. चीन नेपाळला कह्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे; म्हणून भारत तसे कधीच करणार नाही. त्यामुळेच देउबा यांच्यासारखे पंतप्रधान पुन्हा सत्तास्थानी येणे, ही भारतासाठी आशादायक गोष्ट आहे. नेपाळच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी तेथील माओवादी, साम्यवादी आणि चीनवादी विचारांचा पगडा अल्प व्हावा आणि राजकारणातील ढोंगी धर्मनिरपेक्षतावादाचेही समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी देउबा यांना सदिच्छा !