नागपूर येथील विधीमंडळ इमारतीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन !

आमदार सौ. अहिरे यांच्याच हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले

नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – येथील विधीमंडळाच्या विस्तारीत इमारतीमध्ये २० डिसेंबर या दिवशी हिरकणी कक्ष चालू करण्यात आला. हिवाळी अधिवेशनासाठी बाळासह आलेल्या आमदार सौ. सरोज अहिरे यांना बाळाची काळजी घेता यावी, यासाठी विधानभवनात हिरकणी कक्षाचा प्रारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार सौ. अहिरे यांच्याच हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

नोकरदार महिलांना त्यांच्या लहान मुलांची काळजी घेता यावी, स्तनपान करता यावे, यासाठी कार्यालयांमध्ये हिरकणी कक्ष आहेत. अधिवेशनाच्या काळात सौ. अहिरे यांना त्यांच्या बाळाची काळजी घेता यावी, यासाठी नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारीत इमारतीतील दालन क्रमांक १०६ मध्ये हिरकणी कक्ष चालू करण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्याचे कामकाज केले जात असून येथे स्वतंत्र खोली, पाळणा आणि वैद्यकीय सुविधा आहेत.