साधिकेला ‘स्वतःमधील स्वभावदोष आणि अहंचे पैलू’ यांची जाणीव झाल्यावर तिची स्थिती नकारात्मक होणे आणि तिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर त्यांनी सूक्ष्मातून केलेले मार्गदर्शन !
१. ‘स्वतःमधील स्वभावदोष आणि अहंचे पैलू’ यांची जाणीव झाल्यावर नकारात्मक विचारांमुळे रडू येणे
‘माझ्यामध्ये ‘हेवा वाटणे, स्पर्धा करणे आणि मत्सर वाटणे’ हे स्वभावदोष अन् अहंचे पैलू आहेत’, याची मला जेव्हा जाणीव झाली, तेव्हा माझ्या मनात स्वतःविषयी नकारात्मक विचार आले. ‘मी किती वाईट आहे आणि मी असे कोणते पाप केले असेल, ज्यामुळे माझ्या मनावर असे कुसंस्कार झाले ?’, असे वाटून मी रडू लागले.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर त्यांनी सूक्ष्मातून ‘एखादा आजार झाल्याचे कळल्यावर नकारात्मक विचार न करता तो आजार पूर्णपणे बरा होण्यासाठी उपचार करतात, त्याप्रमाणे मनाला झालेला आजार दूर होण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न कर’, असे सांगणे
त्या वेळी मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केली. तेव्हा परात्पर गुरुदेव सूक्ष्मातून मला म्हणाले, ‘‘एखाद्याला काही रोग होतो किंवा आजारपण येते, तेव्हा ती व्यक्ती असा विचार करत नाही की, ‘माझे शरीर किती दूषित आहे आणि मी काय पाप केले होते ?’ ती व्यक्ती असा विचार करते की, ‘अमुक अमुक रोग झाला आहे, तर कोणत्या आधुनिक वैद्यांना दाखवायचे ? कोणती औषधे घ्यायची ? मला बरे व्हायचे आहे.’
स्वभावदोष, म्हणजे मनाला झालेले रोग आहेत. त्यावर औषध घ्यायचे, म्हणजे स्वयंसूचना घेणे आणि शिक्षापद्धत अवलंबणे. ‘त्यातून बरे व्हायचे आहे’, याकडे लक्ष केंद्रित करायचे.’’
‘हे गुरुमाऊली, आपणच मला सकारात्मक केले आणि माझ्यात स्वभावदोष अन् अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवण्याविषयी उत्साह निर्माण केला. मी आपल्या चरणी कृतज्ञ आहे. माझ्याकडून ही प्रक्रिया चिकाटीने आणि सातत्याने करून घ्या’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– कु. सुप्रिया जठार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१.२०२२)
|