तुर्भे गावातील रस्त्यांची महापालिकेकडून दुरुस्ती !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वृत्ताचा परिणाम !

नवी मुंबई, १८ डिसेंबर (वार्ता.) – तुर्भे गावातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांवर पुष्कळ प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याविषयी ११ डिसेंबर या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची नोंद घेत शहर अभियंता विभागाकडून या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

तुर्भे गावात पश्चिमेकडून प्रवेश करण्याचे मुख्य मार्ग म्हणजे योगी एझिक्युटिव्ह हॉटेल लगतचा रस्ता आहे. या रस्त्याच्या लगतच्या इमारतीच्या पाण्याच्या टाक्यांचे पाणी प्रतिदिन ओसंडून वहात रस्त्यावर येत असते. परिणामी ३६५ दिवस या डांबरी रस्त्यावर पाणी आल्याने पुष्कळ प्रमाणात खड्डे पडले होते. महापालिकेला दर ३ ते ४ महिन्यांनी हे खड्डे भरावे लागत आहेत. अशीच स्थिती मंजुला सायकल मार्ट आणि हनुमान मंदिराकडे जाणारा रस्ता, माथाडी कॉलनी ते ए -२ येथील शिव मंदिरामागून जनता मार्केटकडे जाणारा रस्ता या रस्त्यांचीही दुरवस्था झाली होती.

यांतील काही रस्त्यांवर पाण्याचे टँकर भरणे, चायनीज पदार्थांची दुकाने धूऊन त्याचे पाणी रस्त्यावर सोडणे असे प्रकार केले जात आहेत. डांबर आणि पाणी यांचा ३६ चा आकडा असल्याने या ठिकाणी रस्त्याची पुरती चाळण झाली आहे. यावर उपाय म्हणून पालिकेने काही ठिकाणी रस्त्यावर पेव्हरब्लॉक बसवले आहेत.

अन्य ठिकाणी वारंवार तात्पुरते डांबरीकरण करून मलमपट्टी केली जात आहे; मात्र या समस्येच्या मुळाशी जाऊन प्रशासन रस्त्यांवर पाणी सोडणार्‍यांवर कारवाई करणे अपेक्षित आहे; पण असे न करता रस्ते दुरस्तीवर लाखो रुपये खर्च करून जनतेकडून कररूपाने जमा झालेल्या पैशांचा चुराडा (अपव्यय) करण्यातच प्रशासन धन्यता मानत आहे, असा आरोप सुजाण नागरिक करत आहेत.

संपादकीय भूमिका

रस्त्यांवर अनधिकृत व्यावसायिकांच्या गाड्यांमधून पाणी प्रतिदिन येत असेल, तर त्या संदर्भात महापालिका काही कारवाईपर उपाययोजना का काढत नाही ? वारंवार खड्डे पडणे आणि वारंवार खड्डे बुजवणे हे करत रहाण्यापेक्षा रस्त्यांवर खड्डे पडणारच नाहीत, यासाठी उत्तम दर्जाचे रस्ते बनवणे आणि रस्ते कमकुवत करणार्‍या गोष्टींना आळा घालणे आवश्यक आहे. वारंवार रस्त्याची दुरुस्ती काढण्यामागे आर्थिक राजकारण आहे का, असा कुणाला संशय आला, तर नवल ते काय ?