काश्मीरमध्ये जाऊन रहाणार आणि नंतर हिंदूंनाही वसवणार ! – जितेंद्र त्यागी यांची घोषणा

उत्तरप्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष जितेंद्र नारायण त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी)

नवी देहली – उत्तरप्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष जितेंद्र नारायण त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांनी काश्मीरमध्ये रहाण्याची आणि नंतर हिंदूंनाही तेथे वसवण्याची घोषणा एका व्हिडिओद्वारे केली.

१. जितेंद्र त्यागी म्हणाले की, काही जिहादी आतंकवादी संघटना पाकिस्तानच्या साहाय्याने काश्मीरमध्ये हिंदूंना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. माझी काही विचारवंत आणि हिंदु संघटना यांच्याशी चर्चा चालू आहे. आम्ही सरकारच्या साहाय्याने काश्मीरमध्ये लवकरात लवकर हिंदूंना वसवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम मी स्वतः तेथे रहाण्यासाठी जाणार आहे. या योजनेवर काम चालू आहे.

२. एका वृत्तसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्यागी म्हणाले की, कोणत्याही राज्यातून हिंदूंना बाहेर काढता येणार नाही. कुणाला ना कुणाला तरी धोका पत्करून काश्मीरमध्ये जाऊन रहावे लागणारच आहे.

३. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाविषयी ते म्हणाले की, चित्रपटात जे दाखवले, ते फारच अल्प आहे. काश्मिरी हिंदूंनी जे अत्याचार सहन केले आहेत, त्याचा निम्मा भागही चित्रपटात नाही. याविषयीवर मीही एक चित्रपट बनवला आहे; मात्र काही कारणामुळे तो प्रदर्शित होऊ शकलेला नाही.