भारत-चीन सैनिकी संघर्ष आणि भारतीय सैनिकांचे शौर्य !

चिनी सैनिकांची घुसखोरी !

प्रतिकात्मक छायाचित्र

१. चीनचा उलटा कांगावा !

या संघर्षात पुष्कळ चिनी सैनिक घायाळ झाले. हे संपूर्ण प्रकरण उशिरा जाहीर करण्यात आले. याचे कारण असे की, नेमके काय घडले हे निश्चित होते; पण आपले कोणते सैनिक चीनच्या कह्यात सापडले नाहीत ना ? याची खातरजमा केली जाते आणि नंतर सांगण्यात येते. या संघर्षामध्ये आपल्याला मिळालेले युद्धकैदी, म्हणजेच कह्यात आलेल्या चिनी सैनिकांना सोडण्यात आले. त्यानंतर भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी जाहीर केलेली माहिती अतिशय मिळमिळीत होती की, चिनी सैनिकांना आपण थांबवले. याउलट चीनचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ आणि चीनचे प्रवक्ते यांनी वेगळीच माहिती सांगत ‘भारतीय सैनिक चीनच्या सीमेत घुसले होते अन् चीनने त्यांना परतवून लावले. यात अनेक चिनी सैनिक घायाळ झाले’, असा कांगावा केला.

(निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

९ डिसेंबरला भारत आणि चीन सैन्यामध्ये संघर्ष झाला. ३०० हून अधिक संख्या असलेले चिनी सैनिक रात्री ३ वाजता भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते. यासंदर्भात अनेक व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर आपल्याला पहायला मिळाले असतील. रात्रीच्या वेळी तवांगमधील (अरुणाचल प्रदेश) यांगत्से भागात ३०० हून अधिक चिनी सैनिक आले होते; परंतु आपल्या डोंगरावर असलेले भारतीय सैनिक सज्ज होते. त्यांनी लगेच प्रतिकार करण्यास आरंभ केला आणि चिनी सैनिकांना चोपले. चिनी सैनिकांना या प्रतिकाराविषयी कल्पना असल्याने त्यांनी आणखी सैनिक पाठवले. आपल्याकडेही आणखी सैनिक होते. हा संघर्ष पुढे पुष्कळ वेळ चालला. या संघर्षात सैन्यातील शस्त्रे नव्हे, तर बांबू, दंडुके अशा प्रकारची शस्त्रे वापरली गेली. चिनी सैनिकांनी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. जवळजवळ २ वर्षे भारत-चीन सीमा ही शांत होती. गलवान घटनेनंतर पुन्हा सीमा अशांत करण्याचा प्रयत्न केला गेला. ४०० चिनी सैनिक आले, याचा अर्थ की, हे सर्व चिनी अधिकार्‍यांच्या, सरकारच्या अनुमतीमुळेच झाले. ‘रात्री भारतीय सैनिक सज्ज नसतील’, असे त्यांना वाटले. डिसेंबर मासात या भागांमध्ये बर्फ पडायला प्रारंभ होत असतो. प्रसारित झालेल्या व्हिडीओमध्ये आपल्याला बर्फ पहायला मिळतो. बर्फाळ प्रदेशात रात्रीच्या वेळी शून्याहून अल्प तापमान असल्यामुळे सैनिक जागे नसतील, असा विचार करून चिनी सैनिक आपल्या ‘पिकेटवर’ (शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी शत्रूच्या सर्वाधिक जवळ असलेल्या आपल्या सैनिकांचा समूह) येण्यासाठी प्रयत्न करत होते. त्या वेळी आपल्या सैनिकांनी चिनी सैनिकांना चोप दिला. आपण ‘रडारच्या’ मदतीने चिनी सैन्यावर लक्ष ठेवून होतो. आपले ‘ड्रोन्स’ पुढे जात होते, त्यामुळे चिनी सैनिकांनी पुढे यायला आरंभ केल्यानंतर आपण सिद्ध होतो. त्यानंतर चिनी सैनिक मागे पळाले आणि त्यांना अशीही भीती वाटली की, तिथूनच १-२ किलोमीटर लांब असलेल्या चिनी ‘कॅम्प’वर भारतीय सैनिक आक्रमण करील. त्यामुळे त्यांनी कॅम्पमधून गोळीबारही केला.

२. चीनमधील अराजक परिस्थितीला झाकण्याचा चीनचा केविलवाणा प्रयत्न !

अ. चीनमध्ये ‘झिरो कोविड’ किंवा ‘झिरो कोरोना’ या मोहिमेमुळे अनेक ठिकाणी दळणवळण बंदी लागू आहे. यामुळे चीनची जनता सरकारच्या विरोधात गेली आहे. सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने केली जात आहेत. चिनी सरकार गेले अनेक दिवस ही निदर्शने थांबवण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु ते पूर्णपणे थांबत नाही. चीन प्रचंड प्रमाणात तंत्रज्ञान, ‘फेशिअल रेकग्निशन’ (आधुनिक यंत्राद्वारे चेहर्‍याची ओळख पटवणे), ‘सोनिक गन’ यांचा वापर करत आहे. याखेरीज चिनी सैनिकांनी तेथील नागरिकांचे भ्रमणभाष जप्त केले आहेत. सामाजिक माध्यमांवरही चीनचे लक्ष असून कुणी सरकारविरोधी लिखाण प्रसारित केल्यास त्याला त्वरित अटक केली जात आहे. इतकी दडपशाही करूनही चीनमधील हिंसाचार थांबलेला नाही, म्हणून त्यांनी असा प्रकार केला असावा.

आ. चीन हा निर्यात आधारित देश असल्याने त्याची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. एवढेच नव्हे, तर त्यांची अनेक तांत्रिक आस्थापने आणि स्थावर मिळकत क्षेत्र बंद पडले आहे. बेरोजगारीसुद्धा वाढली आहे. या सर्व समस्यांवरून चिनी नागरिकांचे लक्ष भारताकडे वळावे, असा या घुसखोरीमागचा दुसरा हेतू असावा.

३. भारत-चीन संबंध हा शून्याचा पाढा !

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागत आहे. भारत-चीन संबंध सुधारतील, असे काही अधिकारी आणि तत्त्ववेत्ते सांगतात. भारत चीन संबंध हा शून्याचा पाढा आहे. हे संबंध कधीही सुधारणार नाहीत. दिवंगत जनरल बिपीन रावत यांनी चीनच्या डावपेचाला ‘सलमी स्लायसिंग (salami slicing)’ असे नाव दिले होते. याचा अर्थ थोडे थोडे पुढे सरकत रहायचे; कारण भारतीय सैनिक संपूर्ण सीमेवर तैनात नसतात आणि ते तैनात होऊ शकत नाहीत. जिथे सैनिक नसतील, तिथे चिनी सैनिक घुसखोरी करून आत यायचा प्रयत्न करतात. गेल्या काही वर्षांपासून आपण चीनच्या सीमेजवळ मोठ्या प्रमाणात रस्ते बांधत आहोत. चीनचे रस्ते २० वर्षांपूर्वीच भारत-चीन सीमेवर पोचले आहेत. त्यांचे सैनिक केव्हाही रस्त्याने आपल्याकडे येऊ शकतात. आपले रस्ते मात्र सीमारेषेपासून २०-३० किलोमीटर मागे होते. मागील काही वर्षांमध्ये आपल्याकडे सीमारेषेजवळ रस्तेबांधणीचा वेग वाढला आहे; परंतु ते पूर्ण होण्यास आणखी २-३ वर्षे लागतील, असा अंदाज आहे. नुकतेच भारत सरकारने जाहीर केले आहे की, अरुणाचल प्रदेश आणि इतर भागांमध्ये ११२ सहस्र कोटी रुपयांचे नवीन रस्ते, रेल्वेमार्ग सिद्ध केले जात आहेत. रस्ते असतील, तर सैनिक वाहनातून सीमेपर्यंत पोचतील आणि चीनच्या घुसखोरीला प्रत्युत्तर देऊ शकतील. भारतीय सैन्याची प्रत्युत्तर देण्याचा कालावधी अल्प होत आहे, ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आपली सीमेवरील सैनिकांची संख्याही वाढली आहे आणि यामुळे आपली क्षमता आता पुष्कळ वाढलेली आहे.

४. ‘मेक इन इंडिया’ (देशांतर्गत उत्पादन) आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमांचा वेग वाढून सैनिकी अर्थव्यवस्था बळकट व्हायला हवी !

चीन हा आपला शत्रू असून तो पुढील १०० वर्षे शत्रूच राहील. चीनला वाटते की, त्याची अर्थव्यवस्था प्रचंड असल्याने भारतीय सैनिक घाबरून मागे पळून जातील आणि चीनला हा प्रदेश विनायुद्ध  मिळेल, जे त्यांना शक्य झाले नाही. आपल्याकडे काही तथाकथित तज्ञ, काही राजकीय पक्ष यांनी आरडाओरड चालू केली की, अशा घटना सांगितल्या जात नाहीत. लक्षात घ्यावे की, काही गोष्टी सांगता येतात; पण अनेक गोष्टी सांगता येत नाहीत. देशाच्या सुरक्षेसाठी दिले जाणारे सैनिकी आर्थिक प्रावधान वाढवायला हवे. फेब्रुवारी २०२३ मध्ये देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला जाईल. पुढील १० वर्षांमध्ये संरक्षणाची अर्थव्यवस्था प्रतीवर्षी ३५ ते ४० टक्के वाढायला हवी. सर्व राजकीय पक्षांनी या सूत्राला महत्त्व द्यायला हवे. राजकीय पक्षांनी स्थानिक लोकांना रस्तेबांधणीसाठी त्यांच्या भूमी देण्यास सिद्ध करायला हवे. तथाकथित पर्यावरणवादी रस्तेबांधणीमध्ये होणार्‍या झाडांच्या कापणीचा विरोध करतात. त्यांच्यावरही राजकीय पक्षांची सावध दृष्टी असायला हवी. सैन्याचे आधुनिकीकरण व्हायला हवे. ३ वर्षांपूर्वी भारतीय सैन्याचे तत्कालीन ‘व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ’ (उपसैन्यप्रमुख) यांनी सांगितले होते की, भारतीय सैन्याची ८० टक्के शस्त्रे जुनी आहेत. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमांतर्गत निश्चितच शस्त्रे भारतात बनवण्यास प्रारंभ झाला आहे. वायुदलाकडे ४४ क्वाड्रंट्स असायला हवीत, ती सध्या २९ ही नाहीत आणि ती अर्ध्या संख्येवर आहेत. नौदलाचीही अशीच अवस्था आहे. ‘भारत फोर्ज’ हे आस्थापन अतिशय अत्याधुनिक तोफा सिद्ध करत आहे; पण ती तोफ सैन्याला दिली जात नाही; कारण भारतीय सैन्याकडे या तोफांसाठी लागणारे पैसे नाहीत. यासाठीच सैनिकी अर्थसंकल्प वाढवणे, हा एकमेव पर्याय आहे.

५. चीनच्या कुरापती रोखण्यासाठी भारतियांची एकी आवश्यक !

नुकतेच चीनने भारतातील ‘ऑल इंडिया मेडिकल सायंसेस’ या संस्थेवर सायबर आक्रमण केले होते. ही संस्था १५ दिवस बंद पडली होती. यात लाखोंच्या मालमत्तेची, असंख्य लोकांची हानी झाली. अशा चीनच्या कुरापतींना उत्तर देण्यासाठी आपल्याला असे सायबर आक्रमण करता येईल का ? माओवाद्यांना चीनकडून होणारे साहाय्य थांबवता येईल का ? पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पाठवण्यात आलेल्या अमली पदार्थांमुळे झालेली हानी रोखण्यासाठी प्रयत्न करता येईल का ? बांगलादेशातून होणार्‍या घुसखोरीला चीनकडून मिळणारे साहाय्य थांबवता येईल का ? अशी अनेक ‘मल्टी डोमेन’, ‘हायब्रीड’ (विरोधी देशांमध्ये सामाजिक द्वेष वाढवणे), ‘ग्रे झोन’ (युद्धही नाही आणि शांतताही नाही) युद्धे रोखण्याचा प्रयत्न करायला हवा. काही आतंकवाद्यांना ‘जागतिक आतंकवादी’ म्हणून घोषित करायचे होते, ते चीनने आपल्याला करू दिले नाही. पाकिस्तान आणि चीनची युती  तोडायला हवी. यासाठी सर्व भारतीय आणि राजकीय पक्ष यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. भारतीय नागरिकांनी या सर्व विविधांगी युद्धांचा सामना करण्याची सिद्धता ठेवायला हवी ! सीमेवरील युद्धापासून भारतीय सैन्य निश्चित रक्षण करील !’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे

संपादकीय भूमिका

चीनची नांगी ठेचण्यासाठी भारतीय नागरिक आणि केंद्र सरकार यांनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक !