१० ते १७ या वयोगटांतील १ कोटी ५८ लाख मुले व्यसनाधीन ! – केंद्र सरकारने दिली सर्वोच्च न्यायालयाला माहिती

३ कोटी १ लाख व्यक्ती गांजा किंवा त्यापासून बनवलेल्या अमली पदार्थांचे करतात सेवन  

नवी देहली – देशात १० ते १७ वर्षे वयोगटांतील १ कोटी ५८ लाख मुलांना विविध प्रकारचे व्यसन असल्याची धक्कादायक माहिती केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयाला दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीचा संदर्भ देत केंद्र सरकारने ही माहिती दिली.

भारतियांकडून उत्तेजन आणि नशा यांसाठी ‘अल्कोहोल’ हा सर्वाधिक वापरला जाणारा घटक आहे. त्याखालोखाल गांजा, भांग आणि अफू वापरली जाते. अनुमाने १६ कोटी नागरिक मद्यातून ‘अल्कोहोल’चे सेवन करतात. ५ कोटी ७ लाखांहून अधिक व्यक्ती ‘अल्कोहोल’च्या आहारी गेल्या असून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. ३ कोटी १ लाख व्यक्ती गांजा किंवा त्यापासून बनवलेल्या अमली पदार्थांचे सेवन करतात. अनुमाने २ कोटी २६ लाख नागरिक अफूचे सेवन करतात. या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी त्यांना तातडीने साहाय्याची आवश्यकता आहे.

केंद्र सरकारची बाजू मांडतांना अतिरिक्त महान्याय अभिकर्ता ऐश्‍वर्या भाटी यांनी न्यायमूर्ती के.एम्. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना यांच्या खंडपिठाला सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने १४ डिसेंबर २०१६ या दिवशी दिलेल्या आदेशाचे पालन करून  सरकारने देशात अमली पदार्थाच्या वापराची व्याप्ती आणि अमली पदार्थाच्या वापराची माहिती घेण्यासाठी देशव्यापी सर्वेक्षण केले.

अहवालातील अन्य आकडेवारी !

१. नशा करण्यासाठी भारतीय तरुण सामान्यपण ‘अल्कोहोल’चा वापर करतात. एकूण लोकसंख्येपैकी १४.६ टक्के नागरिक (१० ते ७५ वयोगट) मद्यप्राशन करतात, म्हणजेच १६ कोटी नागरिक मद्याचे सेवन करतात.

२. २ महिलांच्या तुलनेने पुरुष अधिक मद्यसेवन करतात. १.६ टक्के महिला, तर २७.३ टक्के पुरुष मद्यसेवन करतात.

३. मद्यसेवनामध्ये ३० टक्के नागरिक देशी दारूचे सेवन करतात, तर ३० टक्के नागरिक भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे सेवन करतात

सर्वाधिक मद्यसेवन करणार्‍या राज्यांत गोव्याचा समावेश !

छत्तीसगड, त्रिपुरा, पंजाब, अरुणाचल प्रदेश आणि गोवा या राज्यांमध्ये सर्वाधिक मद्यप्राशन केले जाते.

संपादकीय भूमिका

  • हे चित्र स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद !
  • मुलांना जर लहानपणापासूनच साधना शिकवली गेली असती, तर मुले सदाचरणी बनली असती !