उज्जैनमध्ये महंमद पैगंबर यांच्यावर निबंध लिहिण्याची स्पर्धा हिंदूंच्या विरोधानंतर स्थगित !

  • गृहमंत्र्यांकडून चौकशीचा आदेश

  • हिंदूंही स्पर्धेत झाले होते सहभागी !

  • हिंदु संघटनांच्या विरोधानंतर स्पर्धा स्थगित !

उज्जैन (मध्यप्रदेश) – येथील ‘पैगाम ए इंसानियत’ सोसायटीकडून निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात सहभागी स्पर्धकांना महमंद पैगंबर यांच्यावर निबंध लिहिण्यास सांगण्यात आले आहे; मात्र यात सहभागी झालेले स्पर्धक मुसलमानेतर म्हणजे हिंदूही आहेत. स्पर्धकांनी नावे नोंदवल्यावर त्यांना पैगंबरांवियी एक पुस्तक दिले जात होते.  त्यामुळे हिंदु संघटनांनी या स्पर्धेला विरोध करण्यास प्रारंभ केला. ‘अशा प्रकारे निबंध स्पर्धेचे आयोजन करणे, हा हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न आहे’, असा आरोप हिंदु संघटनांनी केला आहे. त्यांनी राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्याकडे तक्रार केली आहे. गृहमंत्र्यांनी याची नोंद घेऊन प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश पोलीस अधीक्षकांना दिला आहे. या स्पर्धेला विरोध होऊ लागल्यानंतर आयोजकांनी ही स्पर्धा स्थगित केली आहे.

१. बजरंग दलाचे स्थानिक नेते पिंटू कौशल यांनी सांगितले की, या स्पर्धेमध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी होण्यासाठी २१ सहस्र ५०० रुपये रोख पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहनपर पुरस्कारही देण्यात येणार आहे. (हिंदूंच्या संघटना आणि संस्था हिंदूंसाठी हिंदूंच्या देवतांविषयी अशा प्रकारची निबंध स्पर्धा का आयोजित करत नाहीत ? – संपादक)

२. आयोजक सय्यद नासीर यांनी सांगितले की, प्रत्येक जात आणि धर्म असणार्‍याला महंमद पैगंबर यांची माहिती होण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती; मात्र यावर आक्षेप घेण्यात आल्याने ती स्थगितत करण्यात आली आहे. (ज्याला पैगंबर यांच्याविषयी माहिती घ्यायची असेल, तो स्वतंत्रपणे घेईल. त्यासाठी अशा स्पर्धेची काय आवश्यकता ?  -संपादक)

 संपादकीय भूमिका

  • ‘महंमद पैगंबर यांच्याविषयी निबंध लिहायचे आहे’, हे कळल्यावरही हिंदू यात का सहभागी होत आहेत ? हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने केवळ पुरस्कार मिळवण्यासाठी आणि सर्वधर्मसमभाव जोपासण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये ते सहभागी होत आहेत, हेच लक्षात येते !
  • हिंदूंनी हिंदूंच्या देवतांविषयी अशी स्पर्धा आयोजित केली, तर अन्य धर्मीय कधीतरी यात सहभागी होतील का ?