बिहारमध्ये पुन्हा एकदा दारूमुळे १२ जणांचा मृत्यू

पाटलीपुत्रा (बिहार) – दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये पुन्हा एकदा दारूमुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा दावा नातेवाईक करत आहेत, तर प्रशासनाने मात्र याविषयी कोणतेही भाष्य केलेले नाही. या वेळी ही घटना सारण जिल्ह्यातील इसुआपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोईला गावात घडली. स्थानिक पातळीवर उपचार घेत असलेल्या आणखी १३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दारूबंदीवरून विधानसभेत गदारोळ, मुख्यमंत्री नितीश कुमार संतापले

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा संताप विधानसभा अधिवेशनाच्या वेळी पुन्हा एकदा समोर आला. सारणमध्ये विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूवरून विरोधी पक्षांच्या काही सदस्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या त्यागपत्राची  मागणी केली. त्यामुळे नितीश कुमार चांगलेच संतापले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजयकुमार सिन्हा म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदारांविषयी अपमानास्पद भाषा वापरणे योग्य नाही. ‘मुख्यमंत्री नितीश कुमार यांना क्षमायाचना करण्यास सांगावे’, अशी मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.

संपादकीय भूमिका

जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या राज्यात नावालाच दारूबंदी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले !