जे.एन्.यु. विद्यापिठाच्या भिंतींवर लिहिलेल्या जातीद्वेषवाचक धमक्यांच्या विरोधात कारवाई करा !

रत्नागिरीतील सकल हिंदु ब्राह्मण आणि वैश्य समाज यांची पत्रकार परिषदेतून मागणी

जे.एन्.यु.च्या भिंतींवरील ब्राह्मणविरोधी घोषणा

रत्नागिरी, १३ डिसेंबर (वार्ता.) – जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जे.एन्.यु.) भिंतींवर ब्राह्मण आणि वैश्य समाजाला देश सोडण्याच्या, रक्तपात घडवण्याच्या, बदला घेण्याच्या धमक्या देणारे लिखाण करून संविधानविरोधी कृत्य करणार्‍या संबंधितांचा शोध घेऊन त्यांना विद्यापिठातून कायमचे निलंबित करावे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी, या मागणीसाठी १२ डिसेंबर या दिवशी शहरातील आजगावकरवाडी येथील विश्‍व हिंदु परिषदेच्या जिल्हा कार्यालयात सकल हिंदु ब्राह्मण समाज आणि वैश्य समाज यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत वैश्य समाजाचे प्रतिनिधी श्री. अभय दळी, अखिल चित्पावन ब्राह्मण संघ रत्नागिरीचे कार्यवाह श्री. राजन पटवर्धन, कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री. अनंत आगाशे, देवरुखे विद्यार्थी वसतिगृह आणि ज्ञाती गृह निधी संस्थेचे अध्यक्ष श्री. विनोद जोशी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीचे अध्यक्ष श्री. राकेश नलावडे यांनी संबोधन केले.

पत्रकार परिषदेत डावीकडून सर्वश्री अभय दळी, राजन पटवर्धन, अनंत आगाशे, विनोद जोशी आणि राकेश नलावडे

देहली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या भिंतींवर ‘ब्राह्मणांनो भारत सोडा’, ‘ब्राह्मणांनो विद्यापीठ सोडून निघून जा’, ‘ब्राह्मणांनो-बनियांनो (वैश्यांनो) आम्ही तुमच्यापर्यंत येत आहोत’, ‘आम्ही बदला घेऊ’, ‘रक्तपात घडेल’, ‘गो बॅक टू शाखा’, अशा जातीद्वेषवाचक आणि रक्तपाताच्या धमक्या देणार्‍या घोषणा लिहून सामाजिक अशांतता, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणार्‍या समाजकंटक आणि माथेफिरू यांचा सकल हिंदु ब्राह्मण आणि वैश्य समाज, रत्नागिरी तीव्र शब्दांत निषेध करत आहे. हिंदु समाजात फूट पाडण्यासाठी केलेला हा हिंदु धर्मावरील आघात आम्ही सहन करणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन पंचक्रोशी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्री. अनंत आगाशे यांनी केले.

विद्यापिठात शिकणार्‍या आणि हिंदु समाजाचा घटक असणार्‍या ब्राह्मण, तसेच वैश्य समाजाच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जाऊ नये, याची दक्षता विद्यापिठाकडून घेण्यात यावी. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून त्याची माहिती जनतेसमोर त्वरित खुली करण्यात यावी, अशी मागणी वैश्य समाजाचे प्रतिनिधी श्री. अभय दळी यांनी केली.

या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी, सनातन संस्थचे श्री. हनुमंत करंबेळकर, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. दीपक जोशी, अधिवक्ता सचिन रेमणे, पतंजली योग समितीचे अधिवक्ता विद्यानंद जोग, गोसेवा संघाचे श्री. गणेश गायकवाड, श्री. चंद्रकांत राऊळ, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ब्राह्मण अन् वैश्य समाजाचे ज्ञाती बांधव उपस्थित होते.

श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांनी केला जे.एन्.यु. मधील लिखाणाचा निषेध

श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांना जे.एन्.यु.मधील घटनेची माहिती देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी

पत्रकार परिषदेपूर्वी १० डिसेंबरला वैश्य कुलगुरु श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांचे हातखंबा, ता. रत्नागिरी येथे दर्शन घेऊन जे.एन्.यु. मधील घटनेची माहिती देण्यात आली. त्या वेळी स्वामीजींनी जे.एन्.यु. मधील घटनेचा निषेध दर्शवून या घटनेसंदर्भात होणार्‍या पत्रकार परिषदेला पाठिंबा दर्शवला. वैश्य समाजाच्या वतीने प्रतिनिधी पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.