हिंदु संस्कृतीत सांगितलेले दानाचे महत्त्व !
‘भारतीय संस्कृतीत दानधर्माला विशेष महत्त्व आहे. दानाचे धनदान, अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान आदी प्रकार आहेत. दान हे पापनाशक असून ते पुण्यबळाची प्राप्ती करून देते. ‘या पृथ्वीतलावर दानधर्मासारखा दुसरा निधी (ठेवा) नाही’, असे महाभारतात सांगितले आहे.
१. समाजात दानधर्म करणार्या उद्योगपतींनी ‘अर्पण घेणार्यांनी त्याचा यथोचित विनियोग केला नाही’, अशी खंत व्यक्त केल्यावर ‘सत्पात्रे दान’ करण्याचे महत्त्व अधोरेखित होणे
दानधर्माचे हे महत्त्व लक्षात घेऊन समाजातील अनेक जण विविध व्यक्ती, संप्रदाय, संघटना आदींना धनरूपात दान (अर्पण) देतात. एका राज्यातील एक उद्योगपती समाजात काही ठिकाणी दानधर्म करायचे. एकदा त्यांनी अशी खंत व्यक्त केली, ‘‘आजवर आम्ही केवळ भावनेपोटी अर्पण केले; पण ज्यांनी ते अर्पण स्वीकारले, त्यांनी त्याचा विनियोग यथोचित केला नाही. त्यामुळे यापुढे मी केवळ ‘सत्पात्रे दान’च करणार आहे.’’ या उदाहरणावरून धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे ‘सत्पात्रे दान’ करण्याचे महत्त्व अधोरेखित होते.
२. ‘सत्पात्रे दान’ म्हणजे काय ?
संत, धार्मिक कार्य करणार्या व्यक्ती, समाजात धर्माचा प्रसार करणार्या आध्यात्मिक संस्था आणि राष्ट्र अन् धर्म जागृतीसाठी कार्य करणारे धर्मप्रेमी यांना अर्पण देणे (दान करणे), हे खरे ‘सत्पात्रे दान’ आहे. अशा ठिकाणी अर्पण केल्याने त्याचा यथोचित विनियोग होत असल्याने अर्पणकर्त्याला दानाचे फळ मिळते. अर्पणकर्त्यांनी एखादी संस्था किंवा संघटना यांना दानधर्म करतांना तिचे कार्य, उद्देश आणि अर्पण केलेल्या धनाचा कशा प्रकारे विनियोग केला जातो, याचा डोळसपणे विचार करावा अन् ‘त्यांचे कार्य ईश्वराला अपेक्षित अशा प्रकारे होत आहे ना ?’, याची निश्चिती करावी. अशा प्रकारे ‘सत्पात्रे दान’ केल्याने अर्पणकर्त्याचे पुण्यबळ वाढेल, तसेच त्याला आध्यात्मिक स्तरावरील लाभही होईल.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१०.२०२२)