हत्येच्या प्रकरणातील दोषीला सहस्रो लोकांसमोर गोळ्या झाडून केले ठार !

तालिबानने चालू केली सार्वजनिक ठिकाणी मृत्यूदंड देण्याची शिक्षा !

फराह (अफगाणिस्तान) – येथे हत्येच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या एका व्यक्तीला सार्वजनिकरित्या मृत्यूदंड देण्यात आला. ‘स्पोर्ट्स स्टेडियम’वर सहस्रो लोकांच्या समोर या व्यक्तीला ३ गोळ्या झाडून ठार मारण्यात आले. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती, तिच्या वडिलांनी दोषीवर गोळ्या झाडल्या. तालिबान सत्तेवर आल्यानंतरची ही सार्वजनिक ठिकाणी देण्यात आलेली मृत्यूदंडाची पहिलीच शिक्षा आहे. या वेळी सर्वोच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती, सैन्याधिकारी आणि अनेक वरिष्ठ मंत्री उपस्थित होते. तालिबानचा प्रवक्ता जबिहुल्ला मुजाहिद याने ही माहिती दिली.

हेरात प्रांतातील तजमीर याने ५ वर्षांपूर्वी एकाची हत्या करून त्याची मोटारसायकल आणि भ्रमणभाष चोरला होता. मृताच्या कुटुंबियांनी आरोपीविरुद्ध तक्रार केल्यानंतर त्याला तालिबानने अटक केली होती.

 संपादकीय भूमिका

समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शिक्षेचा धाक असणे आवश्यक आहे. समाज शिक्षेच्या भीतीमुळे अनेक चुकीच्या गोष्टी करण्याचे टाळतो. भारतात गुन्ह्यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा होत नसल्याने गुन्ह्यांचे प्रमाण प्रतिदिन वाढत आहे. त्यामुळे भारतातही अशा शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर कुणाला तरी ती चुकीची वाटेल का ?