महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा तात्पुरती स्थगित : कर्नाटकातूनही महाराष्ट्रात एकही बस नाही !

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वाद

कोल्हापूर – कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वादाच्या पार्श्‍वभूमीवर आणि ६ डिसेंबरला महाराष्ट्रातील ट्रकवर बेळगाव पथकर नाक्याजवळ झालेल्या आक्रमणानंतर ७ डिसेंबरला महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. कर्नाटकातूनही महाराष्ट्रात एकही बस आलेली नाही. यामुळे दोन्ही राज्यांतून येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांचे, तसेच व्यापारी, नोकरवर्ग, विद्यार्थी यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

६ डिसेंबरला कर्नाटक पोलिसांकडून ‘महाराष्ट्रातून बससेवा बंद करावी’, अशी सूचना केली होती; मात्र यानंतरही प्रवाशांच्या सुविधेसाठी कोल्हापूर येथून ७ डिसेंबरला सकाळी २ गाड्या बेळगावकडे सोडण्यात आल्या. या एस्.टी. निपाणी येथे पोचल्यावर सुरक्षततेच्या कारणास्तव पुढे न जाता तेथेच थांबवण्यात आल्या आणि यानंतर बससेवा पूर्णत: बंद करण्यात आली.

सौंदत्ती यात्रेसाठी कोल्हापूरचे ५० सहस्रांहून अधिक भाविक !

कर्नाटकातील सौंदत्ती यात्रेसाठी प्रतिवर्षी कोल्हापूर येथून मोठ्या प्रमाणात भाविक जातात. यंदा ५० सहस्रांहून अधिक भाविक यात्रेसाठी मार्गस्थ झाले आहेत. १७० एस्.टी. गाड्या, २०० ट्रॅव्हल्स, ३०० हून अधिक छोटी चारचाकी वाहने यांचा त्यात समावेश आहे. काल काही काळ या गाड्यांनाही सीमेवर अडवण्यात आले होते; मात्र पोलीस अधीक्षकांच्या हस्तक्षेपानंतर या गाड्या सौंदत्ती येथे मार्गस्थ झाल्या. सध्या महाराष्ट्रातील गाड्यांना कर्नाटक पोलिसांनी संरक्षण पुरवले असून भाविकांनी कोणतीही काळजी न करता कर्नाटकात यावे, असे आवाहन कर्नाटक पोलिसांनी केले आहे.

कर्नाटकने त्यांच्या वाहनांचा रस्ता कोल्हापूर येथून जातो हे लक्षात ठेवावे ! – धनंजय महाडिक, खासदार भाजप

धनंजय महाडिक, खासदार भाजप

कोल्हापूर येथून कर्नाटकची सीमा अवघ्या १० किलोमीटरवर चालू होते. महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करणे अत्यंत चुकीचे असून कर्नाटकने त्यांच्या वाहनांचा रस्ता कोल्हापूर येथून जातो, हे लक्षात ठेवावे, अशी चेतावणी भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.

लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे आणि विनायक राऊत आक्रमक !

देहली – गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाविषयी लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आक्रमक झाले. या संदर्भात सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून बेताल वक्तव्य करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या नागरिकांना बेळगावच्या सीमेवर मारहाण करण्यात आली. गेल्या १० दिवसांपासून महाराष्ट्राच्या विरोधात कट रचला जात आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र तोडण्याची भाषा केली जात आहे.’’

खासदार विनायक राऊत म्हणाले, ‘‘महाराष्ट्र-कर्नाटक हा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. असे असतांना कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर अत्याचार आणि दडपशाही चालू आहे. एका राज्याच्या मंत्र्यांना प्रवेश करण्यास मनाई केली जाते. अशी बंदी घालणारे कर्नाटक हे पहिले राज्य आहे.’’ विनायक राऊत यांनी त्यांचे भाषण मराठीतून केले.

महाराष्ट्राचे खासदार कर्नाटककडून होणार्‍या अत्याचारांविषयी भूमिका मांडत असतांना कर्नाटकच्या खासदारांनी त्यावर आक्षेप घेतला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने संसदेच्या कामकाजातून ही वक्तव्ये काढून टाकण्याचा आदेश लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिला.