महाकालेश्‍वर मंदिरात चित्रपटाच्या गाण्यांवर नृत्य करणार्‍या २ हिंदु महिला सुरक्षा कर्मचारी निलंबित !

उज्जैन (मध्यप्रदेश) – १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणार्‍या श्री महाकालेश्‍वर मंदिरात चित्रपटांच्या गाण्यांवर नृत्य केल्याचे २ व्हिडिओ समोर आले आहेत. वर्षा नवरंग आणि पूनम सेन नावाच्या दोन सुरक्षा महिला कर्मचार्‍यांनी मंदिरातील विश्रामधाम परिसरात नृत्य केल्यामुळे दोघींनाही निलंबित करण्यात आले आहे. यासमवेतच मंदिरात तैनात कर्मचार्‍यांवर ‘स्मार्टफोन’ बाळगण्यावर बंदीही लादण्यात आली आहे. मंदिराची सुरक्षा ‘के.एस्.एस्.’ या आस्थापनाकडे असून या संदर्भातील व्हिडिओ इन्स्टाग्रामवर प्रसारित करण्यात आल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून या आस्थापनाला देण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. (मंदिराचे पावित्र्य भंग करणार्‍या अशा कर्मचार्‍यांना खरेतर बडतर्फ केले पाहिजे ! – संपादक)

(“हे छायाचित्र छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक”)

यापूर्वीही अनेकदा मंदिराच्या परिसरात चित्रपटाच्या गाण्यांवर व्हिडिओ सिद्ध करण्याच्या ५ घटना समोर आल्या होत्या; पण सुरक्षारक्षकांनीच असे कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

संपादकीय भूमिका

अशी संतापजनक घटना कधी अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांच्या संदर्भात घडल्याचे ऐकिवात आहे का ? हिंदूंना धर्मशिक्षणाची किती नितांत आवश्यकता आहे, हेच अशा घटना दर्शवतात !