दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वृत्ताचा परिणाम !
नवी मुंबई, १ डिसेंबर (वार्ता.) – तुर्भे, सेक्टर २१ येथील कै. ज्ञानेश्वर वाळूंज उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणावर गवत वाढल्याने, तसेच शोभेच्या झाडांची छाटणी न केल्याने अस्वच्छता निर्माण झाली होती. याविषयीचे वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. उद्यान विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी त्याची त्वरित नोंद घेत एका दिवसात स्वच्छतेसह वृक्ष छाटणी केली. या वेळी माजी नगरसेविका शुभांगी पाटील यांनीही उद्यानाला भेट देऊन स्वच्छतेविषयी पालिकेच्या कर्मचार्यांना सूचना केल्या.
१. उद्यानातील शोभेच्या झाडांची छाटणी न केल्याने ती बेसुमार वाढली होती. गवत (लॉन) इतके वाढले होते की, त्यावरून चालणे अवघड झाले होते.
२. उद्यानाची योग्य प्रकारे देखभाल केली जात नसल्याने उद्यानातील झाडांच्या बुंध्याजवळ आणि इतरत्र उंदीर-घुशींनी बिळे केली होती. त्यांचाच वावर वाढला होता.
३. उद्यानाला २४ घंटे टाळे लावल्याने नागरिकांना त्याचा वापर करता येत नव्हता.
४. दैनिक ‘सनातन प्रभात’ने हे वृत्त प्रसिद्ध केल्यावर महापालिकेच्या अधिकार्यांनी उद्यान जनतेसाठी खुले केले. कामगारांकडून गवत आणि वृक्ष यांची छाटणी केली. उद्यानामधील बाके आणि अन्य बसण्याच्या जागा स्वच्छ केल्या. उंदरांची बिळे बुजवण्यात आली. उद्यानाच्या दुसर्या भागातील लहान मुलांच्या खेळण्याच्या ठिकाणी पडलेले दगड-गोटे, झाडांचा पालपाचोळा हटवण्यात आला.
५. ‘महापालिकेने सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ या महापालिकेने ठरवून दिलेल्या वेळेत उद्यान नागरिकांसाठी खुले ठेवण्यात यावे’, अशी सक्त ताकीद अधिकार्यांनी कंत्राटदारांला दिली आहे.
संपादकीय भूमिका‘उद्यानाची स्वच्छता करावी’, हे वृत्त दैनिकात प्रसिद्ध झाल्यावर जागे होणारे उद्यान विभागाचे प्रशासन काय कामाचे ? |