धर्मासाठी बलीदान देणार्‍या थोर पुरुषांचे घरोघरी स्मरण होणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

जयपूर (राजस्थान) मध्ये ‘भारत रक्षा मंचा’च्या वतीने गुरु तेगबहाद्दूर बलीदान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

उपस्थितांना संबोधित करतांना श्री. रमेश शिंदे, व्यासपिठावर डावीकडून ‘भारत रक्षा मंचा’चे राजस्थान प्रदेशाध्यक्ष श्री. नटवरलाल शर्मा, ‘शीख संगत’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. गुरुचरणसिंह गिल, ‘मानसरोवर गुरुद्वारा’चे प्रमुख श्री. कुलतारसिंह दुआ आणि ‘भारत रक्षा मंचा’चे राजस्थान प्रदेश कार्यकारी अध्यक्ष श्री. आर्.पी. शर्मा

जयपूर (राजस्थान) – भारत शूरवीर आणि हुतात्मे यांची भूमी आहे. या भूमीत धर्माच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलीदान दिले. राजस्थानमध्ये राजपूत स्त्रियांनी जोहार करून स्वतःला अग्नीत झोकून दिले. छत्रपती संभाजी महाराजांनी सतत ४० दिवस यातना सहन केल्या; पण धर्म सोडला नाही. पूर्वजांचा हा त्याग आणि बलीदान  विसरल्यामुळे देहलीच्या श्रद्धा वालकरला प्राण गमवावे लागले. जेथे लोक स्वधर्म रक्षणासाठी प्राणही देण्यास सिद्ध होते, तेथे आज आपल्या तरुणी एका आफताबसाठी आई-वडिलांना सोडून जात आहेत. हे टाळण्यासाठी आपण आपल्या थोर पुरुषांच्या बलीदानाचे प्रतिदिन स्मरण करण्यासह त्याची हिंदूंच्या घराघरांमध्ये चर्चा झाली पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले. ‘भारत रक्षा मंचा’च्या वतीने गुरु तेगबहाद्दूर बलीदान दिनानिमित्त मानसरोवर येथील अग्रसेन भवनमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते संबोधित करत होते.

या वेळी मंचावर मानसरोवर गुरुद्वाराचे प्रधान श्री. कुलवंदरसिंह दुआ, भारत रक्षा मंचाचे राजस्थान प्रदेशचे कार्यकारी अध्यक्ष श्री. आर्.पी. शर्मा, राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ. अग्रवाल, राजस्थान प्रदेशाध्यक्ष श्री. नटवरलाल शर्मा, प्रदेश संघटनमंत्री श्री. राजेंद्रप्रसाद शर्मा आणि प्रसार-प्रचारप्रमुख श्री. विश्वभूषण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला मंच संघटनेच्या प्रमुख सौ. मूर्ती मीना यांनी केले.

 हिंदु धर्म एक जीवन दर्शन ! – गुरुचरण सिंह गिल, राष्ट्रीय अध्यक्ष, शीख संगत

‘हिंदु धर्म जीवन जगण्याची एक पद्धत आहे’, असे सर्वाेच्च न्यायालय म्हणते; पण हे अपूर्ण आहे. हिंदु धर्म केवळ पद्धत किंवा परंपरा नाही, तर ते एक जीवन दर्शन आहे. ‘गुरुग्रंथसाहिब’मध्ये २ वेळा हिंदुस्थानचा उल्लेख आहे. हे केवळ राजकीय किंवा भौगोलिक कारणांनी नाही, तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कारणांनी आहे. गुरु तेगबहाद्दूर यांना ‘हिंद की चादर’ म्हटले जाते; कारण त्यांनी हिंदुस्थानवरील आक्रमण समजून बाबरच्या आक्रमणाला विरोध केला होता. एक प्रकारे ते हिंदुस्थानच्या रक्षणासाठी ढाल बनले होते. या समवेतच त्यांनी ‘गुरुवाणी’मध्ये भारतात जागृतीचे प्रयत्न करणारे १५ संत आणि भक्त यांचा समावेश केला.

या वेळी भारत रक्षा मंचाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. लक्ष्मीनारायण शर्मा यांनी ‘संघटनाची आवश्यकता आणि संघटनेकडून करण्यात येणार्‍या कार्याची माहिती’, याविषयी उपस्थितांना अवगत केले.