आंध्रप्रदेशची ख्रिस्तीकरणाकडे वाटचाल !

आपला देश धर्मनिरपेक्ष असला, तरी तो केवळ कागदावर आहे, हे देशभरात प्रतिदिन घडणार्‍या घटनांवरून वारंवार दिसून येते. या तथाकथित धर्मनिरपेक्षतेचे पालन केवळ हिंदूंनी करणे बंधनकारक आहे, तर अन्य पंथियांना त्यातून अघोषित मोकळीक असते. या तथाकथित धर्मनिरपेक्षतेचा बुरखा फाडणारा आणखी एक प्रकार आंध्रप्रदेश राज्यात समोर आला आहे. विशाखापट्टणम् येथील वाहतूक पोलिसांच्या पावतीवर चक्क येशू ख्रिस्ताचे चित्र छापल्याचे उघड झाले आहे. इतकेच नव्हे, तर या चित्राखाली बायबलमधील वाक्यही लिहिले आहे. तेलुगू देसम् पक्षाचे नेते अमन वेंकट रमना रेड्डी यांनी ही पावती ट्विटरद्वारे प्रसारित केल्यानंतर हा प्रकार समोर आला.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे स्वतः ख्रिस्ती आहेत. त्यांच्या प्रशस्त बंगल्यावर ख्रिस्त्यांचा मोठा ‘क्रॉस’ लावलेला आहे. ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या घरावर ‘क्रॉस’ असेल, त्या राज्यातील पोलिसांच्या पावतीवर येशू ख्रिस्ताचे चित्र असणे, यात आश्चर्य ते काय ? आपली व्यवस्था निधर्मी आहे; पण या व्यवस्थेच्या माध्यमातून निवडून येऊन काम मात्र ख्रिस्ती धर्माचे केले जाते ! तरीही ते ‘निधर्मी’च असतात, हे आणखी विशेष ! याउलट शाळेत श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याची केवळ घोषणा केली, तरी ‘या देशाचे भगवेकरण केले जात आहे’, असा आरोप पुरो(अधो)गामी करतात. रेड्डी सत्तेवर आल्यापासून धर्मांध ख्रिस्त्यांचे चांगलेच फावले आहे. येथील ख्रिस्ती आता देशाच्या अखंडतेलाही आव्हान देऊ लागले आहेत. मध्यंतरी याच आंध्रप्रदेशमधील ‘ऑल इंडिया ट्रू क्रिश्चियन कौन्सिल’च्या वतीने पाद्री उपेंद्र राव यांनी ‘भारताची २ भागांमध्ये फाळणी करून ख्रिस्त्यांना अर्धा भाग ‘वेगळा देश’ म्हणून दिला पाहिजे. फाळणी केल्यानंतर आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही’, असे विधान केले होते. तरीही एकही पुरोगामी, काँग्रेसवासी किंवा लोकशाहीप्रेमी एका शब्दानेही याविषयी बोलला नाही. याउलट हिंदूंनी केवळ ‘हिंदु राष्ट्र’ असा केवळ उल्लेख जरी केला, तरी हीच पुरोगामी मंडळी ‘लोकशाही धोक्यात आहे’, असे ओरडत सुटतात.

आंध्रप्रदेशमध्ये रेड्डी युग चालू झाल्यापासून त्या राज्याची झपाट्याने ख्रिस्तीकरणाकडे तर वाटचाल होत आहेच; पण हिंदूंवर विविध आघातांची मालिकाही चालू झाली आहे. रेड्डी सरकारच्या आतापर्यंतच्या अनुमाने २२ मासांच्या काळात आंध्रप्रदेशमध्ये मंदिरांवरील आक्रमणाच्या जवळपास १२० हून अधिक घटना घडल्या आहेत. त्यामुळेच आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम्चे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांनी ‘जगनमोहन सरकारच्या राज्यात देवही सुरक्षित नाहीत’, अशी टीका विद्यमान मुख्यमंत्र्यांवर केली. इतकेच नव्हे, तर साधारण ३ मासांपूर्वी या हिंदुद्वेषी सरकारने ‘राज्यातील मंदिरांनी त्यांच्या मुदत ठेवी (फिक्स डिपॉझिट) मोडून धर्मादाय विभागाचे प्रलंबित शुल्क भरावे. त्यांनी हे शुल्क न भरल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल’, असा फतवाच काढला. एवढे होऊनही कुणीही याविरुद्ध चकार शब्दही काढत नाहीत. एकूणच रेड्डी सरकारचे अस्तित्व हे देश आणि हिंदु धर्म यांसाठी मोठा धोका आहे. हे आतातरी लक्षात घेऊन समस्त हिंदूंनी संघटित होणे आवश्यक आहे, अन्यथा आज पोलिसांच्या पावतीवर असणारे येशूचे चित्र उद्या आंध्रप्रदेशची ‘अधिकृत मुद्रा’ व्हायला वेळ लागणार नाही !

संपूर्ण देश ख्रिस्तीबहुल होऊ द्यायचा नसेल, तर हिंदूंनी आतातरी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हावे !