चीनमध्ये दळणवळण बंदीच्या विरोधात निदर्शने तीव्र !

बीजिंग (चीन) – चीनमध्ये कोरोनाच्या काळापासून चालू झालेली ‘झीरो कोविड पॉलिसी’ (शून्य कोरोना धोरण) याच्या विरोधात गेल्या काही दिवसापासून चिनी नागरिक रस्त्यावर उतरून निदर्शने करत आहेत. ही निदर्शने आता प्रतिदिन अधिक तीव्र होऊ लागली आहेत. चीनच्या प्रमुख ९ राज्यांत ही निदर्शने चालू झाली आहेत. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात येत आहे; मात्र तरीही नागरिक माघार घेत नसल्याचे दिसत आहे. २७ नोव्हेंबरला रात्रभर नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या वेळी ते दळणवळण बंदी हटवून मुक्त वातावरण करण्याची मागणी करत आहेत, तसेच राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या त्यागपत्राचीही मागणी केली जात आहे.

१. राजधानी बीजिंगसह हांगझू, चेंगडू, जिनान, चोंगकिंग, शिनजियांग, ग्वांगझो आणि वुहान येथे निदर्शने चालू आहेत. याठिकाणी गेल्या ३ वर्षांपासून लोक सातत्याने सरकारविरोधात घोषणा देत आहेत.

२. चीनमध्ये सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आता चीनमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या ३ लाखांच्या पुढे गेली आहे. यामुळे शी जिनपिंग सरकारने अनेक निर्बंध लादले आहेत. कडक दळणवळण बंदीमुळे ६६ लाख लोक घरात स्थानबद्ध आहेत. हे लोक खाद्यपदार्थांसाठीही घराबाहेर जाऊ शकत नाहीत. प्रतिदिनच्या कोरोना चाचणीमुळेही लोक अप्रसन्न आहेत. शासनाच्या नियमांचे पालन न करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.