चीनची श्रीलंकेत जहाज पाठवून भारताची हेरगिरी !

‘रॉ’च्या प्रमुखांनी घेतली राष्ट्रपती विक्रमसिंघे यांची भेट

कोलंबो (श्रीलंका) – हेरगिरी करणारे चीनचे जहाज ‘युगान वांग-५’ हे ऑगस्ट मासामध्ये श्रीलंकेच्या त्रिनकोमाली बंदरावर काही दिवस थांबले होते. या संदर्भात भारताने श्रीलंकेकडे आक्षेप नोंदवला होता. हे जहाज श्रीलंकेत येण्यापासून ते आतापर्यंत भारताची गुप्तहेर संस्था ‘रॉ’ तेथील स्थितीवर लक्ष ठेवून आहे. नुकतेच ‘रॉ’चे प्रमुख सुमंतकुमार गोयल श्रीलंकेत गेले होते. त्यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि श्रीलंकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सागला रत्नायके यांची भेट घेऊन या संदर्भात चर्चा केली. या चर्चेतील माहिती उघड झालेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनचे जहाज श्रीलंकेत येण्यापूर्वी भारताने श्रीलंकेकडे काही कागदपत्रे सादर केली. त्यामध्ये चिनी जहाज भारताच्या संरक्षणविषयक माहितीची हेरगिरी करण्यासाठीच श्रीलंकेत येत असल्याचे नमूद होते. तरीही श्रीलंकेने चीनच्या दबावामुळे जहाजाला त्याच्या बंदरावर येण्यास अनुमती दिली होती.

संपादकीय भूमिका

श्रीलंकेला कर्ज देऊन चीनने त्याला स्वतःकडे वळवले आहे. त्यामुळे चीन सांगेल, त्याप्रमाणेच श्रीलंका वागणार आहे. हे लक्षात घेऊन भारताने श्रीलंकेशी चर्चा करत बसण्यापेक्षा चीनच्या विरोधात आक्रमक धोरण अवलंबणे आवश्यक !