जगातील प्रत्येक ३ महिलांमागे एका महिलेवर अत्याचार ! – तस्लिमा नसरीन

नवी देहली – जागतिक स्तरावर तीनपैकी एका महिलेला शारीरिक अथवा लैंगिक अत्याचारांना जीवनात एकदातरी सामोरे जावे लागले आहे. यामागे बहुतेक वेळा त्यांचे पती अथवा प्रियकर असतात. जे ठिकाण महिलांना सर्वांत सुरक्षित आणि विश्‍वासाचे म्हणून समजले जाते, त्या घरातच महिलांना द्वेष, त्रास, लैंगिक अत्याचार आणि हत्या यांसारख्या अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे, असे वक्तव्य बांगलादेशी मूळच्या प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केले. आफताब पूनावाला याने श्रद्धा वालकर हिच्या शरिराचे ३५ तुकडे करण्याच्या घटनेवर नसरीन यांनी एक लेख लिहिला आहे. त्यात त्यांनी वरील प्रतिपादन केले आहे.

या लेखात त्या पुढे म्हणतात की, संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार वर्ष २०२० मध्ये जगभरात ८१ सहस्र महिलांची हत्या करण्यात आली. यांमधील ४७ सहस्र महिलांना त्यांचेच कुटुंबीय अथवा पती अथवा प्रियकर यांनी मारले. याचा अर्थ प्रत्येक ११ मिनिटांमध्ये एका महिलेची हत्या करण्यात येते.

नसरीन पुढे लिहितात की,

१. आपल्या सर्वांना हे ठाऊक आहे की, पुरुषप्रधान विचारसरणी, लैंगिक भेदभाव, स्त्रीद्वेष आणि महिलांना न्यून लेखण्याची मानसिकता यांमुळे त्यांच्यावर अत्याचार होतात.

२. जोपर्यंत पुरुषप्रधान विचारसरणी अस्थिर होत नाही, स्त्रीद्वेष नष्ट होत नाही आणि लैंगिक भेदभाव इतिहासजमा केला जात नाही, तोपर्यंत महिलांवर अत्याचार, बलात्कार आणि हत्या करण्याचे सत्र चालूच राहील.

३. एखाद्या समाजाचा रानटीपणा आपोआप नष्ट होऊ शकत नाही, तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. समाजातील स्त्री आणि पुरुष या दोघांचेही समाजाला सभ्य बनवण्याचे दायित्व आहे.