‘हनीट्रॅप’, गूढ आणि काँग्रेसचे मौन !

‘एडविना यांच्यांशी नेहरू यांचे प्रेमसंबंध होते’, अशी मान्यता एडविना यांची मुलगी पामेला यांनीही दिली आहे !

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी ‘भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ‘हनीट्रॅप’मध्ये अडकले होते’, असा गंभीर आरोप केला. भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय माऊंटबेटन यांच्या पत्नी एडविना आणि नेहरू यांचे प्रेमसंबंध होते, हे काही आता लपून राहिलेले नाही. ‘एडविना यांच्यांशी नेहरू यांचे प्रेमसंबंध होते’, अशी मान्यता एडविना यांची मुलगी पामेला यांनीही दिली आहे.

नेहरू यांचे प्रमुख सुरक्षा अधिकारी के.एफ्. रुस्तम यांची दैनंदिनी संपादित करून प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकात एडविना आणि नेहरू यांच्या प्रेमाचा उल्लेख आहे. त्यानंतर नेहरूंचे खासगी सचिव एम्.ओ. मथाई यांनीही त्यांच्या ‘रिमिनिसेंस ऑफ द नेहरू एज’ या पुस्तकात नेहरू आणि एडविना यांच्या संबंधांचा उल्लेख केला आहे. सार्वजनिक ठिकाणी पंतप्रधान म्हणून वावरतांना भारताच्या प्रतिष्ठेला साजेसे वर्तन ठेवणे तरी अपेक्षित होते; परंतु नेहरू यांनी एडविनाविषयी त्याही मर्यादा पाळल्या नाहीत. एडविना यांच्यासमवेत सिगारेट ओढणे, एडविना यांना लगटून विमानातून बाहेर पडणे, तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल समवेत असतांना एडविना यांचा हात पकडणे, अशी अनेक छायाचित्रे संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यातून नेहरू एडविना यांच्या किती आहारी गेले होते, हे दिसून येते.

‘भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ‘हनीट्रॅप’मध्ये अडकले होते’, असा रणजित सावरकरांचा गंभीर आरोप !

व्यभिचारच !

नेहरू आणि एडविना यांच्या संबंधांना काँग्रेसचे काही लोक, बुद्धीवादी आणि विचारवंत ‘मैत्रीपूर्ण संबंध’, ‘निखळ प्रेम’ असे नाव देऊन प्रेमाचे गोडवे गातांना दिसतात; परंतु नेहरू यांची जवळीकता केवळ एडविना यांच्याशीच नव्हती, तर अन्य काही महिलांशीही त्यांचे प्रेमसंबंध होते. याचे दाखले वर उल्लेख केलेले त्यांचे सचिव आणि अधिकारी यांनीच दिले आहेत. इंग्लंडसारख्या देशात विवाहबाह्य संबंधाला अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानण्यात येत असले, तरी भारतीय संस्कृती व्यभिचाराला अभिव्यक्तीस्वातंत्र्य किंवा पुढारलेपण म्हणण्याइतकी घसरलेली नाही. भारतीय संस्कृती ‘स्वैराचारी’ नाही, तर त्यागावर आधारित आहे. भारत  विकासामध्ये काही पावले मागे असला, तरी जेव्हा ‘विश्वगुरु’ म्हणून ओळख सांगितली जाते (हे स्थान भारतालाच प्राप्त आहे) हे येथील संस्कृतीमुळेच ! त्यामुळे पंतप्रधान म्हणून कुणी दुर्लक्ष करत असले, तरी अनेक स्त्रियांशी जवळीकता ठेवणे, हा नेहरूंचा व्यभिचारच होता.

वैयक्तिक आयुष्यात कोणत्याही व्यक्तीचा असा व्यभिचार दुर्लक्षिला जाऊ शकत नाही, तसेच देशाचे दायित्व सांभाळणार्‍या व्यक्तीचा व्यभिचार तर दुर्लक्षित करून चालण्यासारखा नाहीच नाही; कारण पंतप्रधानासारख्या व्यक्तीचे खासगी आयुष्यही सर्वांसाठी प्रेरणादायी असते. त्यामुळे नेहरू हे एडविना यांच्या ‘हनीट्रॅप’मध्ये अडकले असल्याचे आणखी पुरावे इंग्लंडकडे मिळू शकतील. त्या पुराव्यांची मागणी पंतप्रधान मोदी यांनी ब्रिटनकडे करावी, असे आवाहन रणजित सावरकर यांनी केले आहे; परंतु ‘आपल्याच पंतप्रधानांच्या रंगेलपणाचे पुरावे मागणे’, ही गोष्ट भारतासाठी निश्चितच शोभनीय नाही. नेहरू आणि एडविना यांच्या प्रेमप्रकरणाचा चोथा चघळत बसण्यापेक्षा या ‘हनीट्रॅप’च्या माध्यमातून काही राष्ट्रविरोधी कारवाया झाल्या का ? याचे संशोधन मात्र व्हायला हवे. माऊंटबेटन यांना नेहरू आणि एडविना यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती असूनही त्यांनी याविषयी कधी आपत्ती दर्शवल्याचे वाचनात आलेले नाही. एडविना भारतात आल्यावर पंतप्रधानांच्या निवासस्थानी ‘राजकीय पाहुणे’ म्हणून निवासाला थांबत होत्या. हे सर्व प्रकार संशयास्पद आहेत. सद्यःस्थितीत काँग्रेसच्या सत्ताकाळात ‘हनीट्रॅप’सारख्या राष्ट्रविरोधी (नेहरू आणि एडविना ही काही एकच घटना नाही) वा अशा अनेक राष्ट्रघातकी घटना यांच्याकडे काँग्रेसने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले नाही ना ? याचे संशोधन मात्र व्हायला हवे.

सत्य समोर आणा !

ताश्कंद करारावर स्वाक्षरी करण्यासाठी रशियामध्ये गेलेले भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचा तेथेच संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी याविषयी चौकशीची मागणी करूनही त्यावर पुढे चौकशी झाली नाही. देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान व्यक्तीच्या संशयास्पद मृत्यूच्या वेळी काँग्रेस गप्प का राहिली ? याचे कारण आजही देशवासियांना समजलेले नाही. संयुक्त राष्ट्रांच्या सभेला जातांना भारताचे महान अणूशास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांचा विमान अपघातामध्ये संशयास्पद मृत्यू झाला. कैगा अणूऊर्जा केंद्रातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ एल्. महिंलगम यांचे जून २००९ मध्ये काली नदीच्या काठी कुजलेले शरीर सापडले. अशा १-२ नव्हे, तर वर्ष २००९ ते २०१३ या कालावधीत भारताच्या अणूऊर्जा विभागातील १० शास्त्रज्ञांचा गूढरित्या मृत्यू झाला आहे. ही प्रकरणे कुठे प्रसिद्धीझोतात आलीच नाहीत. अशा अनेक गूढ घटना या थेट राष्ट्राच्या सुरक्षेशी संबंधित आहेत की, ज्यांची सखोल चौकशी व्हायला हवी, तसेच या घटना भारताच्या विरोधातील आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे का ? काँग्रेसच्या काळात या घटना दाबण्यात आल्या. या सर्व गूढ घटनांमागे निश्चित राष्ट्रविरोधी कारवाया असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे केवळ नेहरूंच्या ‘हनीट्रॅप’चीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला रोखण्यासाठी कुणाला आणि कशासाठी मोहरा म्हणून वापरले जात आहे, याचा शोध घ्यायला हवा. राष्ट्रासाठी त्याग करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर किती महान होते, ते समोर येण्यासह गांधी-नेहरू कुटुंबीय आणि काँग्रेसवाले यांनी किती देशविरोधी कारवाया केल्या आहेत ? ते स्वतःच ‘माफीवीर’ नाहीत ना ? अशा अनेक प्रश्नांचीही उत्तरे यातून मिळू शकतील.

देशाचे पंतप्रधान ‘हनीट्रॅप’मध्ये अडकणे, ही भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवरील नाचक्की म्हटल्यास चुकीचे काय ?