आंदोलन, संसद आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा हिंदु धर्माभिमान्यांचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाराणसी (उत्तरप्रदेश) येथे ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ पार पडले !

डावीकडून श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी, श्री. चेतन राजहंस, पत्रकार परिषदेत बोलतांना सद्गुरु नीलेश सिंगबाळ आणि अधिवक्ता कमलेश त्रिपाठी

वाराणसी (उत्तरप्रदेश) – भारत आणि नेपाळ अनादि काळापासून हिंदु राष्ट्र होते; परंतु धर्मनिरपेक्ष व्यवस्थेच्या दुष्टचक्रात फसल्यामुळे येथील हिंदूंचे दमन होत आहे. अशा परिस्थितीत परिवर्तन आणण्यासाठी येथे परत घटनात्मकरित्या हिंदु राष्ट्र स्थापन करणे अनिवार्य आहे. हे लक्षात घेऊन लोकशाहीच्या विविध मार्गांनी हिंदु राष्ट्राचे आंदोलन तीव्र करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आशापूरच्या तनिष्क सभागृहामध्ये नुकतेच दोन दिवसांचे प्रांतीय ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनाला उत्तरप्रदेश, बिहार, ओडिशा, उत्तराखंड आदी राज्ये, तसेच नेपाळ आणि अमेरिका येथून एकूण १०० हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे २०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी दिली. ते येथील पराडकर भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करत होते. या वेळी ‘इंडिया विथ विझडम्’चे अध्यक्ष अधिवक्ता कमलेश त्रिपाठी आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनीही पत्रकारांशी संवाद साधला.

१. या वेळी ‘इंडिया विथ विझडम्’ चे अध्यक्ष अधिवक्ता कमलेश त्रिपाठी म्हणाले, ‘‘अधिवेशनात उपस्थित अधिवक्त्यांनी हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांना कायद्याचे प्राथमिक शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. तसेच त्यांना माहिती अधिकाराचा आणि भ्रष्टाचार निर्मूलन कायद्याचा उपयोग कसा करावा ? यांचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासमवेतच प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला ‘भ्रष्टाचार निर्मूलन कार्यकर्ता’ बनवण्याच्या दृष्टीने या अधिवेशनात जागृती करण्यात आली. या अधिवेशनात प्रयागराज आणि वाराणसी येथे स्वतंत्र अधिवक्ता अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय झाला.’’

२. अधिवेशनाला उपस्थित पत्रकारांनी लक्ष्मणपुरी येथे राष्ट्रभक्त पत्रकारांचे एक दिवसाचे अधिवेशन आयोजित करण्याचा निर्णय घेतला.

३. अधिवेशनाला उपस्थित आध्यात्मिक संस्थांच्या प्रतिनिधींनी हिंदु राष्ट्राच्या धर्मकार्यासाठी आध्यात्मिक स्तर वाढवण्यासाठी साधना वाढवण्यावर भर दिला.

४. ‘सनातन संस्थेच्या वतीने मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तींमध्ये स्वतःचे रक्षण कसे करायचे ? याविषयी प्रशिक्षण देण्यात आले’, अशी माहिती सनातन संस्थेेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी दिली.

समान सूत्रांच्या आधारे हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदु धर्मावर होणारे अन्यायाचा वैध मार्गाने प्रतिकार करणार !

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

सद्गुरु नीलेश सिंगबाळ म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घटनात्मक मार्गाने आंदोलन करणे, समाजजागृती करणे, खासदारांना भेटून त्यांचे हिंदुहिताच्या कायद्यांसाठी प्रबोधन करणे आदी उपक्रम राबवण्यासह जनहित याचिकांच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात हिंदु राष्ट्राच्या समर्थनार्थ कायदेशीर संघर्ष करण्याचे एकमताने ठरवले. तसेच या अधिवेशनात सहभागी हिंदुत्वनिष्ठांनी समान सूत्रे योजनेच्या अंतर्गत जिल्हास्तरीय हलाल सक्तीविरोधी कृती समितीची स्थापना करणे, हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन करणे, नियमित हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करणे अशा वैध मार्गाने हिंदु धर्मावर होणारे अन्यायाचा प्रतिकार करण्याचे ठरवले आहे.’’

अधिवेशनाला उपस्थित संत आणि मान्यवर

नेपाळमधून संहिता शास्त्री श्री. अर्जुनप्रसाद बस्तौला, धर्मगुरु व्यासाचार्य किशोर कुमार गौतम, विश्‍व ज्योतिष महासंघाचे अध्यक्ष श्री. लोकराज पौडेल, अमेरिका येथून पू. मां राजलक्ष्मी, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, बिहारचे आचार्य अशोक कुमार मिश्र आदी उपस्थित होते.