‘टोरेस’ या खासगी आस्थापनाकडून गुंतवणूकदारांची लाखो रुपयांची फसवणूक !

मुंबई – मीरा भाईंदरमध्ये ‘टोरेस’ या खासगी आस्थापनाने गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आमीष दाखवत लाखो रुपयांना लुटले. रामदेव पार्क परिसरातील हे आस्थापन कृत्रिम डायमंडची विक्री करते. फसवणुकीच्या या प्रकारामुळे सहस्रो गुंतवणूकदारांसमोर आर्थिक संकट निर्माण झाल्याने ते संतप्त आहेत.

लवकर लाभ होणार असल्याचे वाटल्याने गुंतवणूकदारांनी आस्थापनात मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले. फसवणुकीच्या प्रकारानंतर आस्थापनाचे दादर येथील मुख्य कार्यालय आणि मीरा भाईंदर येथील शोरूम अचानक बंद करण्यात आली. काही गुंतवणूकदारांनी शोरूमबाहेर निदर्शने केली, तर काहींनी पोलिसांत तक्रारी केल्या आहेत. आस्थापनाचे मालक आणि संचालक यांची माहिती गोळा करण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका :

अशांकडून फसवणुकीचे पैसे सव्याज वसूल करून घ्यायला हवेत !