Hizb-Ut-Tahrir Announces Khilafah Conference : कॅनडामध्ये जिहादी आतंकवादी संघटना ‘हिजबुत तहरीर’ने आयोजित केली खलिफा परिषद !

कॅनडाच्या खासदारांकडून विरोध

(‘खलिफा’ म्हणजे ‘उत्तराधिकारी’, ‘शासक’ किंवा ‘नेता’. शरीयतद्वारे शासन करणारा.)

ओटावा (कॅनडा) – जिहादी आतंकवादी संघटना ‘हिजबुत तहरीर’ कॅनडामध्ये ‘खलिफा परिषद’ आयोजित करत आहे. ही परिषद कॅनडातील मिसिसॉगा येथे १८ जानेवारी या दिवशी होणार होती; मात्र येथील महापौरांनी या कार्यक्रमाला विरोध करत कारवाईची मागणी केली. यानंतर ही परिषद हॅमिल्टन शहरामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. ‘खलिफा परत येण्यास विलंब होत असलेले अडथळे दूर करणे’ हा या परिषदेचा विषय आहे. तसेच या परिषदेत ‘पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्यासाठी खलिफाची राजवट कशी आवश्यक आहे’ यावरही चर्चा होणार आहे.

खलिफाचे राज्य आणण्यासाठी परिषदेचे आयोजन

यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट प्रसारित झाली आहे. यात लिहिले आहे की, ‘हिजबुत तहरीर कॅनडा’ तुम्हाला या वर्षीच्या परिषदेसाठी आमंत्रित करत आहे. मुसलमानांवर ओढवलेल्या शोकांतिकेबद्दल जगभरात संताप आहे; परंतु अल्ला आणि प्रेषित यांनी आधीच विजयासाठी योग्य पद्धत प्रकट केली आहे. इस्लामची पूर्ण कार्यवाही करून आणि खलिफाची स्थापना करूनच मुसलमान पुन्हा एकदा जगात त्यांचे योग्य स्थान मिळवू शकतात.

‘हिजबुत तहरीर’वर भारतासह अनेक देशांत आहे बंदी !

हिजबुत तहरीरची स्थापना वर्ष १९५३ मध्ये झाली आणि ती जगभरात इस्लामच्या शासनाचे समर्थन करते. हिजबुत तहरीर भारत, इस्रायल, इंग्लंड, जर्मनी, चीन, रशिया, तुर्की आणि बांगलादेशमधील बंदी घातलेली आतंकवादी संघटना आहे. तिच्यावर कॅनडामध्ये बंदी घालण्यात आलेली नाही आणि ती येथे कार्यरत आहे.

कॅनडात हिजबुतवर बंदी घालण्याची मागणी

अमेरिकेचे उद्योगपती इलॉन मस्क यांनीही ही परिषद कॅनडामध्ये आयोजित करण्याबाबत प्रश्‍न उपस्थित केले आहेत. ‘जस्टिन ट्रुडो यांच्या राजवटीत त्यांचा देश आतंकवाद्यांचे आश्रयस्थान बनला आहे’, असे कॅनडाचे खासदार आणि इतर यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमासह हिजबुत तहरीरवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

जिहादी आतंकवादी संघटनेवर अन्य देशांत बंदी असतांना कॅनडात तिच्यावर बंदी नाही, यातून कॅनडा आतंकवाद्यांना पोसणारा पाकनंतर दुसरा देश ठरत आहे. अशा देशावर आता जगभरातून दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !