दुर्गा वाहिनी आणि मातृशक्ती कोकण प्रांताचा मानवंदना संचलन कार्यक्रम
मुंबई – महिलांनो, आपल्यातील सामर्थ्य ओळखा. आपल्या सामर्थ्याने देवतांनाही लहान बालक बनवणारी माता अनुसयेच्या या भारतात स्त्री निराश्रित कशी असू शकते ? चारित्र्यवान, सुसंस्कारित स्त्री आपल्या सामर्थ्याने परिवार, समाज आणि राष्ट्राचे कल्याण करू शकते. त्यामुळे माता जिजाबाई यांच्याप्रमाणे आपल्या मुलांमध्ये संस्कारांचे बीजारोपण करा, असे मार्गदर्शन पू. साध्वी ॠतंभरा यांनी येथे केले. राणी दुर्गावती तथा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दादर येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विश्व हिंदु परिषदेच्या कोकण प्रांताच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘वर्तमान स्थितीत ‘लव्ह जिहाद’ हे आपल्यासमोर मोठे आव्हान आहे. ‘लव्ह जिहाद’मुळे आपला धर्म, संस्कृती, समाज आणि राष्ट्राची गंभीर हानी होत आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’पासून सावध रहा’, असेही त्या पुढे म्हणाल्या.
या कार्यक्रमाला मुंबई आणि उपनगरातील दुर्गावाहिनी अन् मातृशक्ती विभागाच्या महिला, तसेच बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी एस्.एन्. डी.टी. महाविद्यालयाच्या कुलपती डॉ. उज्ज्वला चक्रधर, तसेच विश्व हिंदु परिषद आणि दुर्गावाहिनी अन् मातृशक्ती विभागाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दुर्गा वाहिनी आणि मातृशक्ती यांच्या महिलांनी राजा शिवाजी विद्यालय ते माहेश्वरी उद्यान आणि पुन्हा राजा शिवाजी विद्यालय असे संचलन केले.