महाकुंभक्षेत्रातील सुरक्षाव्यवस्थेत मोठी वाढ : सर्व भंडार्‍यांचेही प्रशासनाकडून चित्रीकरण !

प्रयागराज – हिंसाचार घडवण्याविषयी सामाजिक माध्यमांवरून आलेल्या धमक्यांच्या पार्श्‍वभूमीवर महाकुंभक्षेत्रातील सुरक्षाव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक आखाड्याच्या परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत, तसेच सुरक्षेच्या कारणास्तव सर्व भंडार्‍यांमध्ये येणार्‍या नागरिकांचे चित्रीकरण चालू करण्यात आले आहे.

कुंभमेळ्यातील मोठ्या कार्यक्रमांचे ड्रोन कॅमेर्‍यांद्वारे चित्रीकरण करण्यात येत आहे. महाकुंभच्या प्रत्येक महाद्वारावर मोठ्या प्रमाणात पोलीस पहारा ठेवण्यात आला आहे. कुंभक्षेत्रात प्रवेश करणार्‍या वाहनांची पोलिसांकडून पडताळणी करण्यात येत आहे. महाद्वारांसह अक्षयवट, लेटे मारुती मंदिर, नागवासुकी मंदिर, त्रिवेणी संगम आदी महत्त्वाच्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासह सर्व पूल, आखाड्यांचे मंडप, दुकाने आदी ठिकाणी पोलिसांकडून पडताळणी चालू आहे. प्रत्येक आखाड्यामध्ये बंदूकधारी पोलीस पहार्‍यासाठी ठेवण्यात आला आहे. आपत्कालीन सुरक्षेच्या दृष्टीने दुर्घटना घडल्यास कोणती दक्षता घ्यावी, याविषयीच्या पोलिसांकडून प्रसंगांचा सराव करण्यात येत आहे.