वैभववाडी – वैभववाडी मतदारसंघातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी यापुढे प्रयत्नशील रहाणार आहे. नाधवडे येथे लवकरच एम्.आय.डी.सी. (महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पाेरेशन – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) निर्माण होणार आहे. माझ्या मंत्रीपदाचा प्रत्येक दिवस हा निस्वार्थीपणे काम करून जनतेची सेवा करण्यासाठी आहे. आता मी एकटा मंत्री नसून तुम्ही सर्व मंत्री झाला आहात, असे विधान मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी येथे केले.
वैभववाडी भाजपच्या वतीने मंत्री राणे यांचा नागरी सत्कार सोहळा पार पडला. या वेळी विविध संघटना, संस्था, मंडळे, शासकीय संघटना, शासकीय अधिकारी, कर्मचारी संघटना यांनीही मंत्री राणे यांचा सत्कार केला.
मंत्री राणे म्हणाले, ‘‘वैभववाडीवासियांनी मला यापूर्वी १० वर्षे निवडून दिले. वैभववाडीचे प्रेम मी कधीही विसरणार नाही. तुमचे आभार मानावेत, तेवढे थोडेच आहेत. यापूर्वी ‘सत्तेत नसलो, तरी मतदारसंघातील प्रत्येकाला नितेश राणे न्याय देणार’ असा विश्वास होता. तुमचा हाच विश्वास मी
कायम राखीन. अधिकार्यांनी यापुढे पारदर्शक आणि निष्ठेने काम केले पाहिजे. कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये. तक्रार आल्यास अधिकार्यांची गय केली जाणार नाही. माझ्यासाठी जनता महत्त्वाची आहे.’’
भाजपच्या सदस्यता अभियानाचा मंत्री राणे यांनी घेतला आढावा !
सध्या भाजपचे सदस्यता महाअभियान चालू आहे. मंत्री राणे यांनी जिल्ह्यात कणकवली, सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला आणि देवगड येथे भेट देऊन या अभियानाचा आढावा घेतला, तसेच कार्यकर्ते अन् जनतेशी संवाद साधला. या वेळी मंत्री राणे यांनी ‘जे भाजपला कायम मतदान करून विजय मिळवून देतात, त्या प्रत्येकाला भाजपचा सदस्य करा’, आदी सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.