अमेरिका, कतार आणि इजिप्त यांच्याकडून मध्यस्थी
तेल अवीव (इस्रायल) – ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हमासचे शेकडो आतंकवादी गाझा पट्टीतून दक्षिण इस्रायलमध्ये घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यात १ सहस्र १३९ इस्रायली मारले गेले. हमासने २५१ लोकांचे अपहरणही केले होते. त्यानंतर युद्धाचा भडका उडाला आणि इस्रायलने हमासचा नायनाट केल्याखेरीज युद्ध थांबवणार नाही, अशी रोखठोक भूमिका घेतली. तब्बल ४५० दिवसांहून अधिक काळापासून चालू असलेल्या या युद्धात गाझाचे ४४ सहस्रांहून अधिक लोक, म्हणजे गाझाची अनुमाने २ टक्के लोकसंख्या मारली गेली आहे. यात हमासच्या अनेक आतंकवाद्यांचा समावेश आहे, तसेच इस्रायली सैन्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी रुग्णालये, शाळा अशा ठिकाणांचा आतंकवाद्यांनी आश्रय घेतल्याने सामान्य जनताही मारली गेली. अमेरिका, कतार आणि इजिप्त अनेक महिन्यांपासून दोन्ही बाजूंमध्ये करार करण्यासाठी मध्यस्थी करत असल्याने ‘युद्धबंदी’ अन् ‘इस्रायली ओलिसांची सुटका’ यांसाठी इस्रायल आणि हमास यांच्यात कतारमध्ये चर्चा चालू झाली आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल कॅटझ यांनी नुकतीच याची माहिती दिली.
१. इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी लेबनॉनचा बंडखोर गट हिजबुल्लावर युद्धबंदीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. युद्धबंदीचे उल्लंघन चालू राहिल्यास इस्रायलला कारवाई करण्यास भाग पाडले जाईल, असा इशाराही कॅटझ यांनी दिला आहे. नोव्हेंबर २०२४ मध्ये वर्षभराच्या संघर्षानंतर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात युद्धबंदी झाली होती.
२. इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’चे प्रमुख डेव्हिड बारनिया हेही कतारला जाऊन ओलिसांच्या सुटकेच्या सूत्रावर चर्चा करू शकतात, असे म्हटले जात आहे.
३. ऑक्टोबर २०२३ मध्ये हमासने गाझा सीमेवर अपहरण केलेल्या २५४ लोकांपैकी आतापर्यंत १५० हून अधिक ओलिसांची सुटका करण्यात आली आहे. अनुमाने १०० लोक अजूनही हमासच्या कैदेत आहेत, तर इस्रायली सैन्याने ३४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.
ओलीस ठेवलेल्या महिला सैनिकाने पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर ठेवला ठपका !
या सगळ्यात हमासने १९ वर्षीय इस्रायली महिला सैनिक लिरी एल्बागचा हिचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. लिरीला हमासने ओलीस ठेवले होते. या व्हिडिओत लीरीने पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर हमासच्या बंदीवासातून इस्रायली ओलिसांची सुटका न केल्याचा ठपका ठेवला आहे. ५ महिला सैनिक अजूनही हमासच्या कैदेत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेतान्याहू यांनी ४ जानेवारीला लिरीच्या पालकांशी यासंदर्भात चर्चा केली. ओलिसांना मायदेशी परतण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची शाश्वती त्यांनी लिरीच्या कुटुंबियांना दिली.