९ जानेवारीपासून राज्यातील किनारपट्टीवर ‘ड्रोन’ लक्ष ठेवणार !

मुंबई – अवैध मासेमारीला प्रतिबंध लावण्यासह राज्याची सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी ९ जानेवारीपासून राज्यातील किनारपट्टीवर ‘ड्रोन’द्वारे लक्ष ठेवले जाणार आहे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरेमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.

१. महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांना किनारपट्टी लाभली आहे. त्यात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यात ‘ड्रोन’चे प्रत्येकी एक युनिट सक्रिय केले जाणार आहे. त्याचे नियंत्रण मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयातून होणार आहे.

२. ‘सागरी मासेमारी नियमन (सुधारणा) कायदा २०२१’नुसार ही सुरक्षात्मक उपाययोजना केली जाणार आहे. त्यासाठी ९ ‘ड्रोन’ भाडेतत्त्वावर घेण्यात आले आहेत. शिरगाव (पालघर), उत्तन (ठाणे), गोराई (मुंबई उपनगर), ससून डॉक (मुंबई शहर), रेवदंडा आणि श्रीवर्धन (रायगड), मिरकरवाडा आणि साखरी नाटे (रत्नागिरी), देवगड (सिंधुदुर्ग) या ठिकाणी ड्रोनची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. किनारपट्टीपासून १२ सागरी मैलांचे अंतर इतकी एका ड्रोनची कार्यकक्षा असणार आहे.