३ सहस्र भारतीय तरुणांना नोकरी आणि व्यवसाय यांसाठी व्हिसा देणार !

पंतप्रधान मोदी यांच्या समवेतच्या पहिल्याच भेटीनंतर ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या सरकारची घोषणा

डावीकडून ब्रिटनचे भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान ऋषी सुनक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

बाली (इंडोनेशिया) – येथे आयोजित ‘जी-२०’ शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाच्या सूत्रांवर चर्चा झाली. या भेटीनंतर ब्रिटन सरकारने भारतासाठी ३ सहस्र व्हिसा जारी करण्याची घोषणा एका योजनेद्वारे केली. यामुळे ब्रिटनमध्ये नोकरीसाठी इच्छुक असणार्‍या भारतीय तरुणांना लाभ होणार आहे. १८ ते ३० वर्ष वयोगटातील जवळपास ३ सहस्र प्रशिक्षित तरुण ब्रिटनमध्ये जाऊन नोकरी आणि व्यवसाय करू शकतात, असा या योजनेचा उद्देश आहे.

परदेशातून ब्रिटनमध्ये शिकण्यासाठी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांपैकी एक चतुर्थांश विद्यार्थी केवळ भारतातील आहेत. तसेच भारतीय गुंतवणुकीमुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये सुमारे ९५ सहस्र लोकांना रोजगार मिळतो. ब्रिटन आणि भारत यांच्यात व्यापार करारावर अजूनही चर्चा चालू असल्याची माहिती समोर येत आहे. हा करार झाल्यास एखाद्या युरोपीय देशासमवेतच भारताचा असा पहिलाच करार असेल.