परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भावसत्संगात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणार्‍या कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) हिला शिकायला मिळालेली सूत्रे

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रत्येक साधकाचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ ठाऊक असल्याने त्यांनी प्रत्येक साधकाला त्याच्या प्रकृतीनुसार साधनेविषयी मार्गदर्शन करणे

‘एकदा एका सत्संगात एका साधकाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना विचारले, ‘‘माझी व्यष्टी साधना चांगली होत नाही. मी काय करू ?’’ त्या वेळी गुरुदेव म्हणाले, ‘‘असेच प्रत्येक वेळी वाटायला हवे. ज्या वेळी ‘मी चांगले प्रयत्न करतो’, असे वाटते, त्या वेळी ‘आपला अहं जागृत झाला आहे’, असे समजावे.’’ दुसर्‍या एका सत्संगात अन्य एका साधकाने हाच प्रश्न विचारला. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘अरे, आपल्याला कोणता आजार झाला आहे किंवा आपण त्यातून बरे झालो आहोत का ? हे आपल्यापेक्षा आधुनिक वैद्यांना ठाऊक असते. त्याप्रमाणे तुझी व्यष्टी साधना होत नाही, हे स्वतः न ठरवता तू अन्यांना विचारून प्रयत्न करायला हवेत.’’ या दोन उत्तरांमधून मला शिकायला मिळाले की, ‘केवळ आणि केवळ गुरुदेवांनाच (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) साधकांच्या प्रकृतीविषयी ठाऊक असल्याने प्रत्येक साधकाला केवळ तेच मार्गदर्शन करू शकतात. ते त्रिकालज्ञानी आहेत. त्यामुळे ते साधकाचे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ जाणून क्षणोक्षणी त्याच्या साधनेला आवश्यक असे मार्गदर्शन करतात.’

कु. अपाला औंधकर

२. अग्निहोत्र पहात असतांना डोळ्यांसमोर सूक्ष्मातून मेंढा दिसणे आणि अग्निदेवाचे वाहन मेंढा असल्याचे नंतर समजणे

माझी आजी (सौ. सुजाता रेणके, कु. अपालाच्या आईची आई) घरी प्रतिदिन ‘अग्निहोत्र’ करते. एकदा सायंकाळी ती अग्निहोत्र करत असतांना मी तिच्या शेजारी बसून सर्व पहात होते आणि मी श्री अग्निनारायणाला प्रार्थना केली. त्या वेळी मी डोळे मिटल्यावर माझ्या डोळ्यांसमोर एक ‘सुवर्ण-तपकिरी रंगाचा मेंढा आला. मी डोळे उघडल्यानंतर ‘मला असे का दिसले ?’, याचे मला आश्चर्य वाटले. त्या वेळी मी गूगलवर ‘अग्निदेव वाहन’, असे शोधले. तेव्हा ‘अग्निदेवाचे वाहन मेंढा आहे’, हे माझ्या लक्षात आले. त्या वेळी मला गुरुदेवांप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती) पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.

३. ‘देवाची आर्ततेने वाट पाहिली, तर देव क्षणार्धात धावून येतो’, असे लक्षात येणे

एकदा पाहुणे येणार होते. त्यांचे स्वागत करण्यासाठी आम्ही त्यांची वाट पहात होतो. पाहुण्यांनी दिलेल्या वेळेपेक्षा ते २ घंटे उशिरा आले. त्या वेळी माझ्या लक्षात आले, ‘सर्वसामान्य व्यक्तीची कितीही वाट पाहिली, तरी ती लवकर येईलच, असे नाही; याउलट देवाची अशी आर्ततेने वाट पाहिली, तर देव क्षणार्धात धावून येतो !’

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ठिकाणी ‘कैलासा’चे दर्शन होऊन ‘ते शिवस्वरूप आहेत’, असे जाणवणे

एकदा सत्संगात मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या आजूबाजूला सर्वत्र पांढरा प्रकाश दिसू लागला. संपूर्ण ‘कैलास’ पर्वतासारखे वायूमंडल जाणवत होते. त्यांच्या चरणांखाली असलेली लादीही मला पांढरी दिसू लागली. सूक्ष्मातून मला ‘ओंकार’ नाद ऐकू आला आणि ‘त्रिशूल अन् डमरू’ दिसले. त्यानंतर पांढरा प्रकाश वाढतच गेला. ‘परात्पर गुरु डॉक्टर साक्षात् शिवस्वरूपच आहेत आणि ज्या आसंदीवर ते विराजमान आहेत, ती आसंदी म्हणजे नंदी आहे’, असे मला जाणवले.

वरील अनुभूती मी परात्पर गुरुदेवांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘अरे, मला नंदी बनवायचेस ना ! म्हणजे मला शिवाची उपासना आणि सेवा करता आली असती !’’ त्या वेळी ‘गुरुदेव साक्षात् विष्णुस्वरूप आहेत. विष्णु सदैव शिवाच्या अनुसंधानात असतात. त्यामुळेच त्यांनी असे म्हटले असेल’, असे मला वाटले आणि मला आनंद झाला.’

५. गुरुदेवांच्या अमर्याद प्रीतीचे वर्णन कुणीही करू शकत नाही !

एका सत्संगात परात्पर गुरु डॉक्टरांना सर्व दैवी बालकांचे बोलणे आवडल्यामुळे त्यांनी आम्हाला खाऊ पाठवला. ते आम्हाला निरोप पाठवत, ‘तुम्हा सर्वांना पुरेसा खाऊ मिळतो ना ? सर्व जण खाता ना ? तुम्हाला कितीही खाऊ दिला, तरी तो अल्पच वाटतो !’ साक्षात् भगवंताचा असा निरोप ऐकून माझी पुष्कळ भावजागृती होत असे. ‘गुरुदेव खाऊ देऊन आमच्यावर प्रीतीचा महावर्षावच करत आहेत’, असे मला वाटायचे. ‘गुरुदेव प्रत्येकाचा किती विचार करतात आणि ते सर्वांवर सतत प्रीती करतात’, हे यातून मला शिकायला मिळाले. त्यामुळे मी कृतज्ञतारूपी अश्रू त्यांच्या चरणी अर्पण केले.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवयवांमध्ये विविध देवतांचे तत्त्व जाणवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या विविध अवयवांकडे पाहिल्यावर मला अंतर्मनापासून आपोआपच विविध देवतांचे स्मरण होऊ लागले आणि त्यांच्यात जे तत्त्व जाणवले, ते पुढे दिले आहे.

‘हे नारायणस्वरूप गुरुदेवा, तुमचा सत्संग मला लाभला’, यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे ! ‘तुम्ही शिकवलेली सूत्रे मला कृतीत आणता येऊन तुमच्या चरणी अर्पण करता येऊ दे’, अशीच आर्ततेने प्रार्थना करते.’

– परात्पर गुरुदेवांची,

कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), फोंडा, गोवा.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक