व्यष्टी आणि समष्टी साधना तळमळीने करणार्‍या अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्‍या सोलापूर येथील सौ. सुनीता पंचाक्षरी (वय ४६ वर्षे) !

सकारात्मक आणि उत्साही असणार्‍या सोलापूर येथील सौ. सुनीता पंचाक्षरी यांची पू. (कु.) दीपाली मतकर (सनातनच्या ११२ व्या समष्टी संत) आणि सहसाधिका सौ. उल्का जठार (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सौ. सुनीता पंचाक्षरी

 पू. (कु.) दीपाली मतकर, सोलापूर

१. सतत सकारात्मक आणि उत्साही

‘काकूंच्या घरी मध्यंतरी अनेक कठीण प्रसंग झाले. काकांना कोरोना आणि अन्यही व्याधी झाल्या, तरीही काकू सकारात्मक, सतत उत्साही आणि आनंदी असतात.

पू. (कु.) दीपाली मतकर

२. सेवेची तळमळ

अ. ‘काकूंना समष्टी सेवेची पुष्कळ तळमळ आहे. ‘समाजात गुरुदेवांचे ज्ञान पोचावे’, यासाठी त्या पुष्कळ प्रयत्न करतात.
आ. काकू महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका होत्या. ‘सेवेला वेळ देता यावा’, यासाठी त्यांनी चांगल्या वेतनाची नोकरी सोडली आणि त्या आता अधिकाधिक वेळ सेवेला देतात.
इ. काकूंनी बीड जिल्ह्यातील गेवराई गावात संपर्क करून काही धर्मप्रेमींना जोडले आहे. त्यांच्या माध्यमातून पंचांग आणि ग्रंथ समाजात पोचावे, तसेच ‘गुरूंचे सर्व ज्ञान समाजात पोचावे’, यासाठी काकू पुष्कळ तळमळीने प्रयत्न करतात.

३. समाजातील जिज्ञासूंशी जवळीक साधणे

काकू समाजातील जिज्ञासू कुटुंबियांना प्रेमभावाने जोडून ठेवतात. सत्संगातील जिज्ञासूंना काकू आईच वाटतात. मनमोकळेपणे जिज्ञासू त्यांच्याशी घरातील प्रसंग सांगून त्यावर काकूंचे मार्गदर्शन घेतात. काकूही त्यांना आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करतात. काकूंच्या सत्संगातील जिज्ञासू साधिका मनमोकळेपणे त्यांच्याशी बोलून त्यांचे साहाय्य घेतात. जिज्ञासूंना काकूंचा आधार वाटतो. काकूंचा पुढाकार घेणे आणि समोरच्यांना आधार देणे हा भाग चांगला आहे.

४. साधनेची तळमळ 

४ अ. गुरुमाऊलींमुळे सर्व शक्य होत असल्याचे काकूंनी सांगणे : काकू सत्संग घेण्याची सेवा करतांना काका कधीच काही मागत नाहीत. कधी संध्याकाळचा अल्पाहार किंवा अन्य काही हवे असल्यास ते आधी किंवा सत्संग झाल्यावरच येतात. काही वेळेला काका काकूंना सत्संग घेत असतांना काही ना काही बोलू लागतात, तरी काकू त्याकडे दुर्लक्ष करून सत्संग घेण्याची सेवा एकाग्रतेने करतात. ‘हे सगळे गुरुमाऊलीमुळे शक्य आहे, अन्यथा मला सत्संग घेता आला नसता’, असे काकू सांगतात.
४ आ. व्यष्टी आणि समष्टी साधना तळमळीने करणे : काकांना कोरोना झाला होता. तेव्हाही काकू स्थिर होत्या. काकांसाठी नामजपादी उपाय करणे, औषधांचे दुकान सांभाळणे, साधना सत्संगाची (या सत्संगात साधना आणि नामजप यांविषयीचे महत्त्व सांगितले जाते.) सेवा, संपर्क सेवा, असे सर्व काकू तळमळीने करायच्या. या कालावधीत त्यांचीही प्रकृती बरी नव्हती. तीव्र शारीरिक त्रासांमुळे त्यांना थकवा असायचा, तरी काकू तळमळीने व्यष्टी आणि समष्टी सेवा करण्यासाठी प्रयत्न करायच्या.

५. काकूंमध्ये जाणवलेला पालट

आता काकूंच्या बोलण्यात गोडवा जाणवतो. ‘त्यांचे बोलणे ऐकत रहावे’, असे मला वाटते.’

सौ. उल्का जठार (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सोलापूर

सौ. उल्का जठार

सेवेची तळमळ : ‘सौ. पंचाक्षरीकाकू ग्रामीण भागात साधिकांना घेऊन प्रसार सेवेसाठी जातात. ‘गुरुकार्य चांगले होऊन सर्वांची साधना व्हावी’, यासाठी त्यांची तळमळ असते.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक २६.१०.२०२१)